ठाण्यात होणार १२५ कोटींचे रस्ते
By Admin | Updated: February 24, 2016 03:06 IST2016-02-24T03:06:31+5:302016-02-24T03:06:31+5:30
एकीकडे ठाणे शहराची वाढती लोकसंख्या, वाढती वाहनसंख्या आणि त्यातून होणारी वाहतुक कोंडी फोडण्यासाठी विकास आराखड्यातील नियोजनाप्रमाणे काही रस्त्यांचे रुंदीकरण आणि
ठाण्यात होणार १२५ कोटींचे रस्ते
ठाणे : एकीकडे ठाणे शहराची वाढती लोकसंख्या, वाढती वाहनसंख्या आणि त्यातून होणारी वाहतुक कोंडी फोडण्यासाठी विकास आराखड्यातील नियोजनाप्रमाणे काही रस्त्यांचे रुंदीकरण आणि नुतनीकरण केले जाणार आहे.
भविष्यातील वाहतुकीचा विचार करुन येत्या आर्थिक वर्षात १२.१९ किमीच्या १६ रस्त्यांचे रुंदीकरण करुन नुतनीकरण केले जाणार आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात १२५ कोटींची भरीव तरतूद करण्यात आली आहे.
सध्या ठाण्याची लोकसंख्या २० लाखांच्यावर असून वाहनांची संख्या १५ लाखांच्या आसपास आहे. यात दुचाकींची संख्या सर्वाधिक आहे. दरवर्षी वाहनांच्या संख्येत आठ ते १० टक्क्यांची भर पडते. परंतु अपुऱ्या-अरूंद रस्त्यांमुळे कोंडी वाढताना दिसते. ती फोडण्यासाठी पालिकेने रस्त्याचे रुंदीकरण आणि नुतनीकरण करण्यावर भर देण्याचे ठरविले आहे. त्यासाठी १२५ कोटींची भरीव तरतूद करण्यात आली आहे. यंदाच्या अथर्संकल्पात विकास आराखड्यातील ५.९ किमीचे दोन रस्ते विकसित करण्यासाठी ४० कोटींची तरतुद आहे. विकास आराखड्यातील २.२३ किमी लांबीच्या मिसिंग लिंक जोडण्यासाठी २५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
युटीडब्ल्युटी व सिमेंट कॉंक्रीटीकरण पध्दतीने १६ किमीचे २१ रस्ते विकसित करण्याचे नियोजन आहे. युटीडब्ल्युटी रस्त्यासाठी ५० कोटी व सिमेंट कॉंक्रीटीकरणासाठी १२ कोटींची तरतुद करण्यात आली आहे.
कन्स्ट्रक्शन टीडीआरचा वापर
कन्स्ट्रक्शन टीडीआरच्या माध्यमातून ४० मीटर रुंदीच्या घोडबंदर रोडवरील वेदांत हॉस्पिटल ते विहंग व्हॅली कॉम्प्लेक्स रस्ता, ४० मीटर रुंदीचा भाईंदरपाडा येथील ट्रक टर्मिनस आरक्षण ते घोडबंदर रस्ता, ३० मीटर रुंदीचा आनंदनगर खेळाचे मैदान आरक्षण ते घोडबंदर रस्ता, ३० मीटर रुंदीचा मार्केट आरक्षण क्र. २ पासून पोस्ट आॅफीस ते पार्कवुड कॉम्प्लेक्सचा रस्ता, ३० मीटर रुंदीचा होरायझन स्कुल ते विजय रेसिडेन्सीमार्गे राणी खन्ना स्कुल रस्ता, ४० मीटर रुंदीचा वाघबीळ रोड ते हिरानंदानी इस्टेट रस्ता, तुर्फेपाडा रस्ता आदींचा यात समावेश आहे.
पालिका निधीतून होणारे रस्ते
महापालिकेच्या निधीतून २४ मीटर रुंदीचा शीळ-दिवा रस्ता, ३० मीटर रुंदीचा दिवा-आगासन देसाई खाडी रस्ता, ४० मीटर रुंदीचा ग्लॅडी अल्वारीस रोड, कोठारी गोडाऊन ते नीळकंठ वुड्स ते घोडबंदर रस्ता, आर. मॉल येथून मनोरमानगर ते कोलशेत रस्ता, बुधाजीनगर रस्ता आदींचा विकास होणार आहे.
पालिका निधीतून रूंदीकरण
पालिका निधीतून विकसित होणाऱ्या विकास आराखड्यातील रस्त्यांत पोखरण रोड नं. १ आणि २, कापुरबावडी नाका ते बाळकुम, कळवा नाका ते मनीषानगर, सुभाष पथ, शिवाजी पथ, महात्मा गांधी रोड, खोपट रोड, राघोबा शंकर पथ, एल. बी. एस. रोड आदी रस्त्यांचा समावेश आहे.