ठाणे : रेल्वे सेवा सुरू झाल्यानंतर ठाणे महापालिका हद्दीत मागील महिन्यातच कोरोनारुग्ण दरवाढीचा ट्रेंड दिसून आला आहे. या १२ दिवसांत शहरात नवे ९५० कोरोनारुग्ण आढळले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८४ एवढे आहे. तर मृत्युच्या प्रमाणातही घट झाली असून शहरात १२ दिवसात केवळ ८ जणांचाच मृत्यू झाला आहे.ठाणे महापालिका हद्दीत मागील दोन महिन्यांपासून कोरोना आटोक्यात आल्याचे दिसत आहे. सध्या प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्यांची संख्या ८४२ एवढी आहे. तर आतापर्यंत ५९ हजार ९४३ जणांना कोरोनाची लागण झाली असून यात ५७ हजार ७७८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर शहरात १,३१३ जणांच मृत्यू झाला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९६.४ टक्के एवढे असून मृत्युदर हा २.१९ टक्के एवढा आहे.१ फेब्रुवारीपासून लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी ठराविक वेळेसाठी सुरू झाल्यानंतर आता काही ठिकाणी कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढल्याचे चित्र दिसत आहे. त्यानुसार ठाणे महापालिका हद्दीत देखील मागील काही दिवस कोरोनाच्या रुग्ण संख्येत काही प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. परंतु, १०० च्या पार रुग्णवाढ दिसून आलेली नाही. शुक्रवारी शहरात ८१ नवे रुग्ण आढळले होते. तर मागील १३ दिवसात शहरात ९५० रुग्ण आढळले आहेत. तर याच कालावधीत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या ९८४ एवढी असून केवळ ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दुसरीकडे पालिकेची यंत्रणा सज्ज असून हॉटस्पॉट भागातही काही बंधने मात्र सध्या तरी असणार नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले.तर कोरोना लसीकरणाचा पहिल्या टप्प्यात आतापर्यंत १८ हजार ३४६ जणांना कोरोना लस दिली आहे. दिवसाचे हे प्रमाण १०० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. तर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर मास्क न वापरण्यांचे प्रमाणही मागील काही दिवसात वाढले आहे. परंतु, मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई मात्र होताना दिसत नाही. मागील काही दिवसात एकावर दंडात्मक कारवाई केलेली नाही.
कोरोना रुग्णांची संख्या सध्या ठाणे शहरात आटोक्यात आहे. तरी देखील पुन्हा रुग्ण संख्या वाढल्यास त्यासाठी आवश्यक असणारी रुग्णालये आजही सज्ज ठेवण्यात आलेली आहेत. परंतु कोरोना रोखण्यासाठी महापालिका स्तरावर सर्वाेतोपरी प्रयत्न सुरु आहेत.- संदीप माळवी, उपायुक्त, ठामपा