दीड महिन्यात मालमत्ताकराची १०७ कोटींची वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:45 IST2021-05-25T04:45:02+5:302021-05-25T04:45:02+5:30
ठाणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका ठाणे महापालिकेला पुन्हा एकदा बसला असून उत्पन्नावर परिणाम झाला आहे. मात्र, यात ...

दीड महिन्यात मालमत्ताकराची १०७ कोटींची वसुली
ठाणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका ठाणे महापालिकेला पुन्हा एकदा बसला असून उत्पन्नावर परिणाम झाला आहे. मात्र, यात महापालिकेला मालमत्ताकराने पुन्हा एकदा तारल्याचे दिसू लागले आहे. एप्रिल आणि मे अशा दीड महिन्यातच महापालिकेच्या मालमत्ताकराची १०७ कोटी ५७ लाखांची वसुली झाली आहे.
ठाणे महापालिकेची आर्थिक उत्पन्नाची घडी कोरोनामुळे पुरती विस्कटली आहे. केवळ मालमत्ता आणि पाणीकर वसुलीतूनच सध्या महापालिकेचा कारभार सुरू आहे. त्यातही पहिल्या लाटेत पालिकेला पहिल्या दोन महिन्यात शून्य उत्पन्न मिळाले होते; परंतु त्यानंतर वर्षअखेरपर्यंत महापालिकेने मालमत्ताकराची ६२४ कोटींची विक्रमी वसुली केली होती. थकबाकीदारांच्या दंडावर १०० टक्के माफीमुळे १२२ कोटींची सवलत दिल्यानंतरही ही विक्रमी वसुली झाली होती. त्यानंतर कोरोनाची लाट ओसरून पुन्हा उत्पन्न वाढेल, अशी आशा होती; परंतु कोरोनाची दुसरी लाट आली आणि महापालिकेच्या उत्पन्नावर पुन्हा परिणाम झाला. इतर विभागाकडून वसुली करता येणार नसली तरी महापालिकेच्या मालमत्ताकर आणि पाणीकराची १०० टक्के वसुली करावी लागणार आहे. त्यानुसार यंदा आर्थिक वर्ष सुरू होताच प्रत्येक करदात्याला मालमत्ताकराची बिले महापालिकेने दिली आहेत. त्यामुळे याचा चांगला परिणाम झाला. गेल्या दीड महिन्यात म्हणजेच कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात ठाणेकरांनी मालमत्ताकर भरण्यास दिलेल्या प्रतिसादामुळे महापालिकेला आर्थिक दिलासा मिळाला आहे.
सध्या शासनाकडून येणाऱ्या अनुदानातून कर्मचाऱ्यांचा पगार होत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रशासनाने गेल्या दीड महिन्यांपासून मालमत्ताकराची वसुली सुरू केली आहे. एप्रिल महिन्याच्या मध्यावधीपासून या करवसुलीला सुरुवात करून यंदाही करसवलत योजना लागू केली आहे. यात नागरिकांना ऑनलाइनद्वारे मालमत्ताकराचे देयक उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांच्या घरोघरी देयके पोहोच करण्याचे काम सुरू आहे. त्यानुसार आतापर्यंत तिजोरीत मालमत्ताकरापोटी १०७.५७ कोटींची वसुली झाली आहे.