वर्षभरात शेतकऱ्यांसाठी १०० सिंचन विहिरी
By Admin | Updated: September 29, 2015 01:07 IST2015-09-29T01:07:21+5:302015-09-29T01:07:21+5:30
कोरडवाहू शेतकऱ्यांना भाजीपाल्यासारखी नगदी दुपार पीके घेणे शक्य व्हावे; यासाठी नरेगाद्वारे ठाणे जिल्ह्यातील पाच तालुक्यांसाठी १०० सिंचन विहिरी मंजूर झाल्या आहेत

वर्षभरात शेतकऱ्यांसाठी १०० सिंचन विहिरी
सुरेश लोखंडे , ठाणे
कोरडवाहू शेतकऱ्यांना भाजीपाल्यासारखी नगदी दुपार पीके घेणे शक्य व्हावे; यासाठी नरेगाद्वारे ठाणे जिल्ह्यातील पाच तालुक्यांसाठी १०० सिंचन विहिरी मंजूर झाल्या आहेत. त्यासाठी प्रत्येकी सुमारे तीन लाख रूपये खर्च अपेक्षित धरला असून सुमारे तीन कोटी रूपये खर्चून वर्षभरात त्या बांधल्या जाणार आहेत.
कल्याण, शहापूर, मुरबाड, अंबरनाथ आणि भिवंडी या पाच तालुक्यांमध्ये प्रत्येकी २० सिंचन विहिरी बांधण्यास मंजुरी मिळाली आहे. प्रत्येक विहिरीसाठी सुमारे तीन लाख रूपये खर्च अपेक्षित आहे. मागील वर्षापर्यंत केवळ एक लाख ९० हजार रूपये या विहिरींसाठी मिळत होते.
पण वाढती महागाई व बांधकाम साहित्याच्या किंमती लक्षात घेता आता हा तीन लाख रूपये खर्च अपेक्षित धरलेला आहे. यातून या विहिरी २४० फूट म्हणजे सुमारे आठ मिटर खोल खोदण्याचे निकष निश्चित केले आहेत. परंतु, काही वेळेस या खोली आधीच विहिरीला पाणी लागलेले असते तर काही ठिकाणी खडक लागत असल्यामुळे त्यांची कामे अर्धवट राहत असल्याचे निदर्शनास आले आहे.