मेअखेरपर्यंत होणार नाल्यांची १०० टक्के सफाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:45 IST2021-05-25T04:45:24+5:302021-05-25T04:45:24+5:30
ठाणे : शहरातील नाल्यांची सफाई योग्य पद्धतीने सुरू आहे. सध्या नाल्यांची सफाई ६० ते ७० टक्के झाली आहे. ३१ ...

मेअखेरपर्यंत होणार नाल्यांची १०० टक्के सफाई
ठाणे : शहरातील नाल्यांची सफाई योग्य पद्धतीने सुरू आहे. सध्या नाल्यांची सफाई ६० ते ७० टक्के झाली आहे. ३१ मेपर्यंत ही सफाई १०० टक्के होईल, असा दावा महापौर नरेश म्हस्के यांनी केला आहे. पावसाळ्यात जेथे पाणी साचते, अशा ठिकाणी टीम कार्यरत केल्या जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
महापौर म्हस्के, उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर व स्थानिक नगरसेवक सोमवारी दुपारी २ वाजल्यापासून नालेसफाईच्या पाहणी दौऱ्यात उपस्थित होते. यावेळी त्यांनी ज्ञानसाधना महाविद्यालय, पासपोर्ट कार्यालय, थिराणी शाळेजवळ, लोढा, ऋतू पार्क, एसटी वर्कशॉप आणि वंदना बसस्टॉप येथील नालेसफाईची पाहणी केली. मनपा अधिकारी आणि संबंधित कंत्राटदारांना यावेळी काही महत्त्वाच्या सूचनाही केल्याचे म्हस्के यांनी सांगितले.
नालेसफाई करताना नाल्यांना जी गटारे मिळतात तीही साफ होणे गरेजेचे आहे. त्याठिकाणीदेखील कचरा काढला जात आहे. तसेच कचरा उचलण्यासाठी नाल्यांच्या ज्या काही भिंती तोडल्या जात आहेत, त्या पुन्हा उभारण्याबाबतही संबंधितांना सांगितले आहे. नाल्यातून बाहेर काढलेला कचरा व गाळ पूर्णपणे उचलण्यात यावा. तसेच तेथील रस्ता स्वच्छ धुऊन घ्यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
‘तेथे’ विशेष टीम नेमणार
मागील वर्षीचा अनुभव पाहता पाणी कुठे साचेल, याची देखील माहिती घेण्यात आलेली आहे. यासाठी पावसाळ्यात पुन्हा दौरा केला जाणार आहे. तसेच पावसाळ्यात नाल्यातून अनेक वस्तू वाहून येतात. त्यामुळे प्रवाह अडला जातो. त्यानुसार कुठे हा प्रवाह अडला जातो, याचीही माहिती घेण्यात आलेली आहे. त्याठिकाणी विशेष टीम नियुक्त केली जाणार असून त्यांच्या माध्यमातून काम केले जाणार असल्याचेही म्हस्के यांनी स्पष्ट केले.
-----------------