१०० सीसीटीव्हींचा वॉच
By Admin | Updated: September 15, 2016 02:20 IST2016-09-15T02:20:43+5:302016-09-15T02:20:43+5:30
अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जन सुरळीत पार पाडण्यासाठी स्थानिक पोलिसांसह पालिका प्रशासन सज्ज झाले आहे

१०० सीसीटीव्हींचा वॉच
भार्इंदर : अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जन सुरळीत पार पाडण्यासाठी स्थानिक पोलिसांसह पालिका प्रशासन सज्ज झाले आहे. केवळ मुख्य मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आल्याचे पोलीस उपअधीक्षक नरसिंग भोसले यांनी सांगितले. दरम्यान, मिरवणुकीवर १०० पेक्षा अधिक सीसीटीव्हींची नजर राहणार आहे.
गणपती विसर्जनासाठी ठाणे ग्रामीण पोलिसांनी एकूण ५५० पोलीस कर्मचाऱ्यांची बंदोबस्तासाठी नियुक्ती केली आहे. त्यात १ अतिरिक्त अधीक्षक, ४ उपअधीक्षक, ४५ अधिकारी व ५०० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे ५० होमगार्ड, ८० वाहतूक कर्मचारी व ट्रॅफिक वॉर्डन, दंगल नियंत्रण पथक, महिलांसाठी छेडछाडविरोधी पथके, घातपातविरोधी पथके विसर्जनमार्गांसह विसर्जनस्थळी तैनात करण्यात आली आहेत. तसेच शीघ्र कृती दलाच्या तीन पथकांना पाचारण करण्यात आले असून काशिमीरा, मीरारोड व नवघर परिसरात सज्ज ठेवण्यात आली आहेत.
पोलिसांच्या मदतीसाठी गेल्यावर्षीप्रमाणे मुस्लिम समाजातील सुमारे १२० स्वयंसेवक घेण्यात आले आहेत. त्यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेचे १५०, राष्ट्रीय छात्रसेनेचे ६० व इतर सामाजिक संस्थांच्या २५० स्वयंसेवकांना सहभागी करून घेण्यात आले आहे. विसर्जनावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहरभर सुमारे १०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यावर, विशेष कक्षासह पोलीस व पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नियंत्रण राहणार आहे.
विसर्जनासाठी भार्इंदर पश्चिमेकडील पोलीस ठाणे ते खाडीपर्यंतचा मुख्यमार्ग व भार्इंदर पूर्वेकडील गोल्डन नेस्ट वाहतूक बेट ते फाटकमार्गे स्टेशन रोड व जेसलपार्क चौपाटीदरम्यानच्या मुख्य मार्गावर रिक्षा, बस यांना सायंकाळी ४ ते रात्री ११ पर्यंत तात्पुरती बंंदी घातली आहे.
विसर्जनस्थळे
भार्इंदर पश्चिमेकडील खाडीसह मांदली, राव, मुर्धा, राई व मोर्वा तलाव, उत्तन परिसरासाठी नवी खाडी
भार्इंदर पूर्वेस जेसलपार्क चौपाटी, गोडदेव, नवघर तलाव
काशिमीरा येथे जरीमरी, सुकाळा, एमआयडीसी तलाव, घोडबंदर येथे चेना नदी, काजूपाडा खदाण, रेतीबंदर, संक्रमण शिबिराजवळील तलाव
मीरारोड येथे शिवार गार्डन तलावात विसर्जनाची सोय करण्यात आली असून प्रत्येक ठिकाणी विसर्जनासाठी विशेष मनुष्यबळ व विसर्जन पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
मीरा रोड : जेसल पार्क खाडीकिनारी मोठ्या गणपतीमूर्तींच्या विसर्जनासाठी रेल्वेमार्गाजवळील जुन्या धककयावर दोन क्रेनची व्यवस्था करण्याची मागणी ज्येष्ठ नगरसेवक रोहिदास पाटील यांनी केली आहे.
नवीन धककयावर दोन क्रेन व एक फोरक्लिप्स असते. पण, शेवटच्या दिवशी विसर्जनासाठी मोठी गर्दी होते. मोठ्या मूर्तींची संख्या जास्त असल्याने विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजतात.
यंदा पहाटे ५ पर्यंत भरती आहे. त्यामुळे रेल्वे मार्गाजवळील जुन्या धक्क्यावर मोठ्या मूर्तींसाठी दोन क्रेनची व्यवस्था केल्यास विसर्जन पहाटे ५ पर्यंत भरतीच्या वेळेत पूर्ण होईल, अशी मागणी पाटील यांनी आयुक्त डॉ. नरेश गीते यांच्याकडे केली आहे.
पालिकेनेही सुमारे ४०० अधिकारी व कर्मचाऱ्यांची पथके विसर्जनस्थळी नियुक्त केली आहेत. महत्त्वाच्या विसर्जनस्थळी रुग्णवाहिकांसह डॉक्टर, परिचारिका, आवश्यक औषधांचा साठा, अग्निशमन दलाच्या गाड्या व जवान सज्ज ठेवण्यात आले आहेत. उर्वरित ठिकाणी डॉक्टरांसह परिचारिका व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. भार्इंदर खाडीसह जेसलपार्क चौपाटी येथे प्रत्येकी १ मोठी क्रेन, प्रत्येकी २ फोरक्लिप्स, तराफे व पुरेशा उजेडासाठी हायमास्ट व उच्च प्रकाशाच्या दिव्यांची सोय करण्यात आली आहे. या दिवशी सुमारे अडीच हजारांहून अधिक गणपतीमूर्तींचे विसर्जन होणार आहे.