रेतीमाफियांवर धडक कारवाईत १० कोटींचे साहित्य जप्त

By Admin | Updated: October 1, 2015 01:38 IST2015-10-01T01:38:04+5:302015-10-01T01:38:04+5:30

जिल्ह्यातील अवैध रेतीउपशाविरोधात एकाच वेळी ठाणे जिल्हा प्रशासनाकडून ठाणे, कल्याण व भिवंडीतील रेतीबंदरांवर कारवाई करण्यात आली

10 crore worth of material seized in the raid on the sand mafia | रेतीमाफियांवर धडक कारवाईत १० कोटींचे साहित्य जप्त

रेतीमाफियांवर धडक कारवाईत १० कोटींचे साहित्य जप्त

ठाणे : जिल्ह्यातील अवैध रेतीउपशाविरोधात एकाच वेळी ठाणे जिल्हा प्रशासनाकडून ठाणे, कल्याण व भिवंडीतील रेतीबंदरांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई मंगळवारी रात्री सुरू होऊन बुधवारी सकाळपर्यंत सुरू होती. या कारवाईत अंदाजे ३ हजार २२१ ब्रास रेतीसह ४२ क्रेन, ८२ लाकडी बोटी, तीन ट्रक त्याचबरोबर १ ड्रेझर, २ सक्शन पंप आणि पाच बार्ज जप्त करण्यात आले आहेत. यांची किंमत अंदाजे १० कोटींच्या घरात असून अशा प्रकारे आतापर्यंतची सर्वाधिक मोठी कारवाई असल्याचे बोलले जाते.
अवैध प्रकारे होणाऱ्या रेतीउपशाप्रकरणी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसेंदिवस तक्रारींचा ओघ वाढत आहे. त्यानुसार, ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी, संबंधित तहसीलदार व इतर महसूल कर्मचारी अशा १०० ते १५० अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.
या वेळी जिल्ह्यातील सर्व रेतीबंदरांच्या खाडीपात्रांमध्ये ठाणे ग्रामीण पोलिसांच्या गस्ती नौकांनी पाहणी करून कारवाई केली. त्यानुसार, ठाण्यातील मुंब्रा-पारसिक रेतीबंदर येथून ५३ ब्रास रेती, गायमुख येथून ९ क्रेन व १५ लाकडी बोटी आणि १२५ ब्रास रेती, गांधी रेतीबंदरातून १ क्रेन,३२ लाकडी बोटी आणि १५० ब्रास रेती आणि नागला रेतीबंदरमधून ३५ लाकडी बोटी व १०५ ब्रास रेतीसाठा जप्त केला. तसेच कल्याण तालुक्यातील कल्याण रेतीबंदरातून ३ ट्रक व ३९१ ब्रास रेतीसाठा आणि २० क्रेन, मोठागाव ठाकुर्लीमधून ५० ब्रास रेती आणि १२ क्रेन जप्त केल्या आहेत. याप्रकरणी बाजारपेठ आणि विष्णूनगर या पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल केले आहेत. भिवंडी तालुक्यातील मौजे वेहले रेतीबंदरावरून २ सक्शन पंप खाडीत बुडविण्यात आले. अंजूरफाटा ते चिंचोटी पूल येथून ५८९ ब्रास रेती, काल्हेर येथून १९७ ब्रास रेती आणि कशेळीतून ८५ ब्रास रेतीसाठा जप्त केला आहे. त्याचबरोबर जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांनी भिवंडी मौजे दिवे-अंजूर येथील खारेगाव ब्रीजखाली असलेल्या खाडीकिनाऱ्यालगत कारवाई करून १ ड्रेझर, २ सक्शन पंप व ५ बार्ज जप्त केले आहेत.
याप्रकरणीही अज्ञातांविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. जप्त केलेल्या ३ हजार २२१ ब्रास रेतीसाठ्याचा लिलाव करण्यात येणार आहे. त्याची किंमत १ कोटी १३ लाख ४२ हजार ५०० रुपये असावी, असा अंदाज वर्तविला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 10 crore worth of material seized in the raid on the sand mafia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.