मुंबईकर आर्यन गोविसची शानदार विजयी सलामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 04:10 IST2019-11-12T04:09:56+5:302019-11-12T04:10:00+5:30
पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा क्रिकेट संघटना (पीएमडीटीए) यांच्या वतीने आयोजित चॅलेंजर टेनिस स्पर्धेत मुंबईच्या आर्यन गोविसने शानदार विजयी सलामी दिली.

मुंबईकर आर्यन गोविसची शानदार विजयी सलामी
पुणे : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए ) आणि पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा क्रिकेट संघटना (पीएमडीटीए) यांच्या वतीने आयोजित चॅलेंजर टेनिस स्पर्धेत मुंबईच्या आर्यन गोविसने शानदार विजयी सलामी दिली. दुसरीकडे अनिरूद्ध चंद्रशेखर, मनीष सुरेशकुमार व चंद्रिल सूद या भारतीय खेळाडूंनीही सोमवारी विजयी सलामी दिली.
म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरु असलेल्या या स्पर्धेत जागतिक क्रमवारीत ८६७व्या क्रमांकावरील आर्यनने पहिल्या फेरीत खळबळजनक विजय मिळवित जागतिक क्रमवारीत ४८० व्या स्थानी असलेल्या जर्मनीचा तोबीस सिमोनचे आव्हान टायब्रेकमध्ये ६-४, ७-६ (४) असे संपविले. हा सामना १ तास १९ मिनिटे रंगला. अनिरुद्धने कझाखस्तानच्या तिमूर खाबिबुलीनचा ४-६, ६-४, ६-३ असा पाडाव केला. मनिष सुरेशकुमार याने सरळ दोन सेटमध्ये बाजी मारत भारताच्याच अन्वित बेंद्रे याचा ६-२, ६-० असा पराभव केला.