Leander Pace, a league important for talented players and promoting the game | गुणवान खेळाडूंसाठी आणि खेळाच्या प्रसारासाठी लीग महत्त्वाची, लिएंडर पेस

गुणवान खेळाडूंसाठी आणि खेळाच्या प्रसारासाठी लीग महत्त्वाची, लिएंडर पेस

मुंबई : ‘युवा खेळाडूंच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि खेळाच्या प्रगतीसाठी लीगचे होणे महत्त्वाचे आहे. अशा लीगमधूनच आपल्याला गुणवान खेळाडू मिळतात,’ असे मत भारताचा स्टार टेनिसपटूलिएंडर पेस याने व्यक्त केले.

मुंबईत शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पेसने लीग स्पर्धांना अधिक प्रोत्साहन दिले गेले पाहिजे असे म्हटले. मुंबईत होणाºया प्रीमियर लीग टेनिस स्पर्धेत पेस मुंबई लायन्स संघाचा सह-मालक आहे. पेस म्हणाला की, ‘आपल्या देशात युवा खेळाडूंची कमी नसून त्यांच्यामध्ये मोठी गुणवत्ता आहे. त्यामुळेच अशा खेळाडूंसाठी आणि टेनिस खेळाच्या प्रसारासाठी लीगचे आयोजन होणे महत्त्वाचे आहे. आज भारतीय क्रीडा क्षेत्राचा आलेख उंचावत आहे. अनेक खेळांमध्ये भारतीयांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.’

पेस यावेळी आयपीएलचे उदाहरण देताना सांगितले की, ‘क्रिकेटमध्ये आयपीएल स्पर्धेकडे बघा. आज अनेक युवा खेळाडू या स्पर्धेत चमकले व त्यानंतर त्यांनी हळूहळू आंतरराष्ट्रीय स्तरही गाजवला. अशीच गुणवत्ता फुटबॉलसाठी आयएसएल आणि इतर खेळांच्या लीगमध्येही दिसून आली. अनुभवी खेळाडूंच्या संपर्कात राहिल्याने युवा खेळाडूंना आपल्या खेळाचा स्तर उचावण्यात मदत मिळते.’

पेसने यावेळी युवा खेळाडू सुमित नागलचे कौतुक केले. नागलने यंदाच्या यूएस ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या सलामीला स्वित्झर्लंडचा टेनिससम्राट रॉजर फेडररविरुद्ध पहिला सेट जिंकण्याचा पराक्रम केला होता. फेडररविरुद्ध ग्रँडस्लॅम स्पर्धेत सेट जिंकणारा नागल पहिला भारतीय ठरला. याविषयी पेस म्हणाला की, ‘सुमितने यूएस ओपनमध्ये जबरदस्त खेळ केला. सुमीतला खेळ जवळून पाहिला आहे. त्याने ज्युनिअर विम्बल्डन दुहेरी जेतेपद पटकावल्यापासून आपल्या खेळात मोठी सुधारणा केली. कॅनडामध्ये मी त्याच्यासोबत खेळलो असून त्याचा बॅकहँडच आणि पायांची हालचाल शानदार आहे. माझ्यामते सुमितपुढे सर्वात मोठे आव्हान आहे ते, आपल्या खेळामध्ये सातत्य राखणे.’

‘यूएस ओपनसाठी पात्र ठरणे ही खूप मोठी गोष्ट आहे, मी स्वत: अशी कामगिरी केली आहे. मुख्य फेरीत फेडररसारख्या दिग्गजाविरुद्ध आणि तेही प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या आर्थर अ‍ॅश स्टेडियममध्ये खेळणे, सोपे नसते. सुमित मानसिकरीत्याही स्वत:ला चांगल्या प्रकारे तयार करतो. सुमितप्रमाणेच रामकुमार रामनाथन, प्रजनेश गुणेश्वरन हे युवा टेनिसपटूही भारतासाठी चांगली कामगिरी करत आहेत,’ असेही पेसने यावेळी सांगितले.  


टेनिससाठी मी खूप समर्पित असून तंदुरुस्तीला माझे कायम पहिले प्राधन्य असते. या वयातही सात्यत्यपुर्ण कामगिरी करण्याआधी मी, वडिल डॉ. वेस पेस यांच्यांसोबत नियोजन करतो. यामध्ये सरावाची वेळ, डाएट प्लानिंग, व्यायाम, योगा अशाप्रकारचे वेळापत्रक ठरवतो. मानसिक ताण कमी करण्यावरही मी अधिक लक्ष देतो. यामुळेच वयाच्या ४६व्या वर्षीही मला स्पर्धात्मक टेनिस खेळताना अडचण येत नाही. मला खेळण्याची प्रेरणा घरातूनच मिळते.
- लिएंडर पेस

Web Title: Leander Pace, a league important for talented players and promoting the game

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.