India's Manish Suresh Kumar to advance to Challenger Tennis | भारताच्या मनीष सुरेशकुमारची धक्कादायक विजयासह चँलेंजर टेनिस स्पर्धेत आगेकूच

भारताच्या मनीष सुरेशकुमारची धक्कादायक विजयासह चँलेंजर टेनिस स्पर्धेत आगेकूच

पुणे : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए ) आणि पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा क्रिकेट संघटना (पीएमडीटीए) यांच्या वतीने आयोजित चॅलेंजर टेनिस स्पर्धेत मंगळवारी झालेल्या दुसऱ्या फेरीच्या लढतीत भारताच्या मनीष सुरेशकुमार याने खळबळजनक विजय मिळवला. जपानच्या सोळाव्या मानांकित रिओ नागोची याच्यावर विजय मिळवताना सुरेशकुमारने सर्वांचे लक्ष वेधले.
म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरु असलेल्या या स्पर्धेत मनीषने रिओचे आव्हान ६-३, ७-६ (४) अशा फरकाने संपुष्टात आणले. या शानदार विजयासह त्याने उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. जागतिक क्रमवारीत ७४८ व्या क्रमांकावर असलेल्या चेन्नईच्या या २० वर्षीय खेळाडूने आपल्यापेक्षा बलाढ्य आणि जागतिक क्रमवारीत ४०८व्या स्थानी असलेल्या जपानी प्रतिस्पर्ध्याला सरळ दोन सेटमध्ये नमविले. ही लढत १ तास ३६ मिनिटे चालली.
पाचव्या मानांकित इंग्लंडच्या जे क्लार्कने फ्रान्सच्या केल्विन हेमरीवर ६-४, ६-४ ने सरशी साधली. दुसºया फेरीतील एकतर्फी झालेल्या सामन्यात ११व्या मानांकित जपानच्या सुईची सेकिगुचीने रशियाच्या रोमन ब्लोखिनचा ६-३, ६-० असा धुव्वा उडविला. सुईची याच्या वेगवान खेळापुढे रोमन याला सामन्यात आपला खेळ सादर करण्याची फारशी संधीच मिळाली नाही. अन्य एका लढतीत पात्रता फेरीतून स्पर्धेच्या मुख्य फेरीत स्थान मिळवलेल्या माजी राष्ट्रीय विजेत्या दलविंदर सिंग यानेही सरळ दोन सेटमध्ये विजय मिळवताना भारताच्याच कृणाल आनंदचा ६-३, ६-४ असा पराभव केला.

Web Title: India's Manish Suresh Kumar to advance to Challenger Tennis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.