Federer created a new record | फेडररने रचला नवीन विक्रम

फेडररने रचला नवीन विक्रम

लंडन : आठ वेळेसचा विम्बल्डन पुरुष एकेरीतील चॅम्पियन रॉजर फेडरर याने विजयासह आणखी एक विक्रम रचला. तसेच अन्य विजेतेपदाच्या सर्वच प्रबळ दावेदारांनी सहजपणे या प्रतिष्ठित स्पर्धेच्या अंतिम १६ मध्ये स्थान पटकावण्यात यश मिळवले.
फेडररने फ्रान्सच्या लुकास पाउली याचा ७-५, ६-२, ७-६ असा पराभव करीत ग्रँडस्लॅममधील ३५० व्या विक्रमी विजयाची नोंद केली. त्याने १७ व्यांदा विम्बल्डनच्या चौथ्या फेरीत स्थान पक्के केले. स्पेनचा राफेल नदालनेदेखील फ्रान्सच्या जो विल्फ्रेड सोंगाविरुद्ध ६-२, ६-३, ६-२ अशा विजयासह अंतिम १६ मध्ये प्रवेश केला. नदाल पुढील फेरीत पोर्तुगालच्या जाओ सोसा याच्याशी खेळेल. जाओ सोसा याने डेन इव्हान्सचा ५ सेटमध्ये पराभव करीत पुरुष एकेरीतील ब्रिटनच्या आशा संपुष्टात आणल्या. जपानच्या केई निशिकोरी याने एई सुगियामाचा पराभव केला. अमेरिकेच्या सॅम कुरे याने आॅस्ट्रेलियाच्या जॉन विलमॅनचा ७-६, ७-६, ६-३ असा पराभव केला.
महिला एकेरीत जागतिक क्रमवारीतील नंबर वन अ‍ॅश्ले बार्टीने प्रथमच चौथ्या फेरीत स्थान पटकावले. सात वेळेसची चॅम्पियन सेरेना विलियम्सनेदेखील १६ व्यांदा अंतिम १६ मध्ये प्रवेश केला. बार्टीने हॅरियट डॉर्ट हिचा ६-१, ६-१ असा पराभव केला, तर सेरेनाने ज्युलिया जॉर्जेस हिच्यावर ६-३, ६-४ अशी मात केली. बार्टी आता अंतिम आठमध्ये पोहोचण्यासाठी अमेरिकेच्या अमानांकित एलिसन रिस्केविरुद्ध दोन हात करील. सेरेनाचा सामना स्पेनच्या कार्ला सुआरेज नवारो हिच्याशी होईल. दोन वेळेसची चॅम्पियन पेट्रा क्विटोव्हा पाच वर्षांत प्रथमच अंतिम १६ मध्ये पोहोचली आहे. क्विटोव्हाने पोलंडच्या मोग्दा लिनेटे हिचा ६-३,
६-२ असा पराभव केला.

बोपन्ना, शरण पराभूत
दिविज शरण, रोहन बोपन्ना यांच्या पराभवाबरोबरच भारताचे विम्बल्डनच्या मिश्र दुहेरीतील आव्हान संपुष्टात आले आहे. बोपन्ना-सबालेंका या जोडीला सिटाक - सिगेमंड या जोडीकडून पराभवाचा सामना करावा लागला. शरण आणि यिंगयिंग दुआन यांना एडेन सिल्वा व इवान होयत या जोडीकडून पराभूत व्हावे लागले.

Web Title: Federer created a new record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.