फेडरर ठरला वर्षातील सर्वोत्तम खेळाडू; सहाव्यांदा मारली बाजी; मानले नदालचे आभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 00:50 IST2018-03-01T00:50:49+5:302018-03-01T00:50:49+5:30
‘मी मोठ्या आवाजात ओरडून नदालचे आभार मानू इच्छितो. मागचे वर्ष अविश्वसनीय होते. त्याच्यासारख्या खेळाडूमुळे आपल्याकडे एक चांगला सामना होता. नदालमुळेच मी चांगला खेळाडू बनू शकलो'.

फेडरर ठरला वर्षातील सर्वोत्तम खेळाडू; सहाव्यांदा मारली बाजी; मानले नदालचे आभार
मोनॅको : दुखापतीतून सावरून गेल्या वर्षी जबरदस्त पुनरागमन केलेल्या दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर याने पुन्हा एकदा जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान काबीज केले. त्याचवेळी त्याने यंदा पुन्हा एकदा प्रतिष्ठेचा लॉरियस क्रीडा पुरस्कारही पटकावला. विशेष म्हणजे ‘वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू’ आणि वर्षातील ‘सर्वोत्तम पुनरागमन’ असे दोन पुरस्कार मिळविताना फेडररच्या एकूण लॉरियस पुरस्कारांची संख्या सहा झाली आहे. या वेळी, त्याने या यशाचे श्रेय आपला कट्टर प्रतिस्पर्धी राफेल नदाल याला देतानाच ‘नदालमुळे मी चांगला खेळाडू बनू शकलो,’ असे मत व्यक्त केले.
दखल घेण्याची बाब म्हणजे फेडरर आणि स्पेनचा दिग्गज राफेल नदाल या दोघांनीही दुखापतीचे चक्र भेदून जानेवारी २०१७ सालच्या आॅस्टेÑलियन ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. या वेळी फेडररने नदालचे आव्हान परतावून लावत तब्बल साडेचार वर्षांचा ग्रँडस्लॅम जेतेपदाचा दुष्काळ संपवला होता. शिवाय या वर्षी त्याने विम्बल्डन स्पर्धाही जिंकली. दुसरीकडे, नदालने फ्रेंच आणि यूएस ओपन पटकावत आपले वर्चस्व राखले. यासह २०१७ वर्ष या दोन दिग्गजांनी गाजवले.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर फेडररने म्हटले की, ‘मी मोठ्याने नदालचे आभार मानू इच्छितो. मागचे वर्ष अविश्वसनीय होते. त्याच्यासारख्या खेळाडूमुळे आपल्याकडे एक चांगला सामना होता. नदालमुळेच मी चांगला खेळाडू बनू शकलो. तो अविश्वसनीय खेळाडू व तेवढाच शानदार मित्र आहे.’ त्याचवेळी, वर्षातील सर्वोत्तम महिला खेळाडूचा पुरस्कार अमेरिकेची दिग्गज टेनिसपटू सेरेना विलियम्सला प्रदान करण्यात आला. सेरेनाने पाचव्यांदा लॉरियस पुरस्कारावर नाव कोरले. तसेच अमेरिकेचे माजी दिग्गज धावपटू एडविन मोसेस यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
‘मी मोठ्या आवाजात ओरडून नदालचे आभार मानू इच्छितो. मागचे वर्ष अविश्वसनीय होते. त्याच्यासारख्या खेळाडूमुळे आपल्याकडे एक चांगला सामना होता. नदालमुळेच मी चांगला खेळाडू बनू शकलो'.