डब्ल्यूटीए टेनिस स्पर्धेमध्ये अंकिता रैनाची उपांत्यपूर्व फेरीत धडक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2017 09:52 PM2017-11-23T21:52:44+5:302017-11-23T21:53:00+5:30

भारताची युवा टेनिसपटू अंकिता रैनाने मुंबई ओपन डब्ल्यूटीए टेनिस स्पर्धेतील आपली घोडदौड कायम राखताना उपांत्यपूर्व फेरीत धडक मरली.

Ankita Raina's quarterfinal clash in WTA tennis tournament | डब्ल्यूटीए टेनिस स्पर्धेमध्ये अंकिता रैनाची उपांत्यपूर्व फेरीत धडक

डब्ल्यूटीए टेनिस स्पर्धेमध्ये अंकिता रैनाची उपांत्यपूर्व फेरीत धडक

Next

मुंबई : भारताची युवा टेनिसपटू अंकिता रैनाने मुंबई ओपन डब्ल्यूटीए टेनिस स्पर्धेतील आपली घोडदौड कायम राखताना उपांत्यपूर्व फेरीत धडक मरली. अंकिताने दणदणीत विजयासह आगेकूच करताना थायलंडच्या पिआंगटार्न प्लिपुएच हिचा ६-२, ६-२ असा फडशा पाडला. त्याचवेळी, ग्रेट ब्रिटनच्या पाचव्या मानांकीत नाओमी ब्रॉडी आणि फ्रान्सच्या अमानदीन हेस्से यांनीही आपआपल्या लढती जिंकताना विजयी कूच केली.

चर्चगेट येथील क्रिकेट क्लब आॅफ इंडिया (सीसीआय) येथे सुरु असलेल्या या सामन्यात अंकिताने जबरदस्त खेळ करताना ताकदवर फटके मारत प्लिपुएचला सहज नमवले. पहिल्या फेरीत प्लिपुएचने ऑस्ट्रेलियाच्या सहाव्या मानांकीत लिझेट काबरेरा हिला नमवत सर्वांचे लक्ष वेधले होते. त्यामुळे या सामन्यात प्लिपुएचच्या विजयाची शक्यता जास्त वर्तवली जात होती. मात्र, अंकिताने सर्वांचा अंदाज चुकीचा ठरवताना शानदार विजय मिळवला.

पहिल्या सेटच्या तिस-या गेममध्येच प्लिपुएचने अंकिताची सर्विस ब्रेक करत अपेक्षित खेळ केला. मात्र, अंकिताने जबरदस्त पुनरागमन करताना २-२ अशी बरोबरी साधल्यानंतर सलग चार गेम जिंकून आघाडी घेतली. यानंतर दुसऱ्या सेटमध्येही अंकिताने प्लिपुएच डोके वर काढणार नाही, याची पुरेपुर दखल घेत सहजपणे बाजी मारली. पुढील फेरीत अंकिताचा सामना फ्रान्सच्या अमानदीन हेस्सेविरुद्ध होईल.
हेस्सेनेही स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करताना इस्त्रायलच्या डेनिझ खाझानिउकविरुद्ध ६-३, ४-६, ६-१ असा झुंजार विजय मिळवला. पहिला सेट जिंकून आघाडी घेतल्यानंतर हेस्सेला डेनिझने चांगली टक्कर देत सामना बरोबरीत आणला. अंतिम व निर्णायक सेटमध्ये मात्र हेस्सेने जबरदस्त आक्रमक खेळ करताना डेनिझचा धुव्वा उडवला. अन्य एका लढतीत, ब्रिटनच्या ब्रॉडीने सरळ दोन सेटमध्ये विजयाची नोंद करताना जपानच्या जुन्री नामिगाताविरुध्द ६-२, ६-२ असा दणदणीत विजय मिळवला.

Web Title: Ankita Raina's quarterfinal clash in WTA tennis tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.