झेडटीईच्या या स्मार्टफोनमध्ये आहे जंबो बॅटरी

By शेखर पाटील | Published: March 13, 2018 03:00 PM2018-03-13T15:00:42+5:302018-03-13T15:00:42+5:30

यात इनबिल्ट व्हाईस सर्च सुविधा देण्यात आली आहे. याच्या मदतीने कुणीही युजर आपल्या स्मार्टफोनमध्ये हवे ते अ‍ॅप वा फोल्डर सर्च करू शकतो.

ZTE smartphone jumbo battery feature | झेडटीईच्या या स्मार्टफोनमध्ये आहे जंबो बॅटरी

झेडटीईच्या या स्मार्टफोनमध्ये आहे जंबो बॅटरी

Next

मुंबई: झेडटीई कंपनीने नुबिया एन ३ हा स्मार्टफोन जागतिक बाजारपेठेत सादर केला असून यात अतिशय उत्तम दर्जाची बॅटरी देण्यात आली आहे. बॅटरी हा स्मार्टफोनमधील कॅमेर्‍याच्या खालोखाल लोकप्रिय असणारा घटक आहे. यामुळे बहुतांश कंपन्या दर्जेदार बॅटरीने सज्ज असणारे स्मार्टफोन सादर करण्याला प्राधान्य देत आहेत. या अनुषंगाने झेडटीई कंपनीने नुबिया एन३ हे मॉडेल बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. वर नमूद केल्यानुसार यात उत्तम दर्जाची म्हणजेच तब्बल ५,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी दीर्घ काळाचा बॅकअप देण्यास सक्षम असून याला निओपॉवर ३.० या तंत्रज्ञानाने युक्त असणारी फास्ट चार्जींग प्रणाली देण्यात आली आहे. यातील दुसरे लक्षणीय फिचर म्हणजे यात इनबिल्ट व्हाईस सर्च सुविधा देण्यात आली आहे. याच्या मदतीने कुणीही युजर आपल्या स्मार्टफोनमध्ये हवे ते अ‍ॅप वा फोल्डर सर्च करू शकतो. याच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप असून यात नेमके किती मेगापिक्सल्सचे कॅमेरे आहेत याची माहिती कंपनीने दिलेली नाही. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात १६ मेगापिक्सल्सचा कॅमेरा असेल. हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट आवृत्तीवर चालणारे असून यावर कंपनीचा युजर इंटरफेस असेल.

झेडटीईच्या नुबिया एन ३ या स्मार्टफोनमध्ये ५.९९ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस क्षमतेचा (२१६० बाय १०८० पिक्सल्स) आयपीएस डिस्प्ले दिलेला आहे. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ६२५ प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम ४ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा दिली आहे. हा स्मार्टफोन काळा, सोनरी आणि लाल या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये ग्राहकांना सादर करण्यात आला आहे. पहिल्यांदा हे मॉडेल चीनमध्ये मिळणार असून लवकरच याला भारतीय बाजारपेठेत उपलब्ध करण्यात येईल असे संकेत मिळाले आहेत.
 

Web Title: ZTE smartphone jumbo battery feature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.