WhatsApp हे संवाद साधण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम आहे. मोठ्या प्रमाणात त्याचा वापर केला जातो. मात्र आज सकाळपासून WhatsApp Web युजर्सना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. सोशल मीडियावर युजर्सनी याबद्दल तक्रार केली आहे. WhatsApp Web वरून मेसेज पाठवण्यात अडचणी येत असल्याचं सांगितलं आहे. तसेच काही लोकांना आणखी एका वेगळ्याच समस्येचा सामना करावा लागत आहे ती समस्या म्हणजे WhatsApp Web वर स्क्रोलिंगला प्रॉब्लेम येत आहे. युजर्स आपलं WhatsApp चॅट स्क्रोल करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना आलेले मेसेज वर, खाली करून पाहणं अवघड झालं आहे. सुरुवातीला अनेक लोकांना आपला लॅपटॉप किंवा माऊस खराब झाला असेल असं वाटलं. मात्र प्रत्यक्षात WhatsApp Web डाऊन झालं आहे. गेल्या तासाभरात अनेक युजर्सनी ट्विटरवर याबाबत पोस्ट केली आहे.
" WhatsApp Web मध्ये काही समस्या आहे का? मी वर आणि खाली स्क्रोल करू शकत नाही" असं म्हणत युजर्स आपली समस्या सोशल मीडियावर शेअर करत आहेत. रविवारपासून मेसेजिंग अॅप WhatsApp Web सेवा भारतात डाऊन झाली होती. अनेक युजर्सनी संदर्भात तक्रारी केल्या आहेत. सेवा पूर्ववत झाल्यावरच ते पुन्हा वापरू शकतील. WhatsApp Web युजर्सना सध्या काही काळ वाट पाहावी लागेल. याबाबत WhatsApp कडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
WhatsApp डाउन होण्याची प्रमुख कारणं
सर्व्हर डाउनटाइम
WhatsApp, फेसबुक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या सर्व्हरमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यास सेवा विस्कळीत होते.
डोमेन नेम सिस्टम (DNS) बिघाड
जेव्हा DNS सर्व्हरमध्ये बिघाड होतो, तेव्हा युजर्स वेबसाइट किंवा अॅप्सशी कनेक्ट होऊ शकत नाहीत.
बॉर्डर गेटवे प्रोटोकॉल (BGP) समस्या
BGP मधील बिघाड किंवा बॅकबोन राउटरच्या कॉन्फिगरेशनमध्ये झालेल्या बदलांमुळे व्हॉट्सअॅपसारख्या सेवांवर परिणाम होतो.
डिस्ट्रिब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिस (DDoS) हल्ला
अनेकदा सायबर हल्ल्यांमुळे (DDoS) सर्व्हरवर प्रचंड लोड येतो, ज्यामुळे सेवा ठप्प होते.