व्हॉट्सअॅप वेबवर वापरकर्त्यांना लॉग इन करताना अडचणी येत आहेत. जे वापरकर्ते आधीपासून लॉग इन आहेत, त्यांना संदेश पाठवता आणि मिळवता येत आहेत. मात्र, मोबाईल अॅपवर व्हॉट्सअॅप सामान्यपणे काम करत आहे. डाउनडिटेक्टरच्या अहवालानुसार, रविवारी दुपारी १:३५ वाजल्यापासून ही समस्या सुरू झाली आहे. याबाबत व्हॉट्सअॅपकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
रविवारपासून मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपची वेब सेवा भारतात डाऊन झाली आहे. अनेक वापरकर्त्यांनी यासंदर्भात तक्रारी केल्या आहेत. सेवा पूर्ववत झाल्यावरच ते पुन्हा व्हॉट्सअॅप वेब वापरू शकतील. व्हॉट्सअॅप वेब वापरकर्त्यांना सध्या काही काळ वाट पाहावी लागेल. याआधी जुलै महिन्यातही व्हॉट्सअॅप डाऊन झाल्यामुळे वापरकर्त्यांना चॅटिंगमध्ये अडचणी आल्या होत्या.
व्हॉट्सअॅप डाउन होण्याची प्रमुख कारणे
सर्व्हर डाउनटाइम: व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या सर्व्हरमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यास सेवा विस्कळीत होते.
डोमेन नेम सिस्टम (DNS) बिघाड: जेव्हा DNS सर्व्हरमध्ये बिघाड होतो, तेव्हा वापरकर्ते वेबसाइट किंवा अॅप्सशी कनेक्ट होऊ शकत नाहीत.
बॉर्डर गेटवे प्रोटोकॉल (BGP) समस्या: BGP मधील बिघाड किंवा बॅकबोन राउटरच्या कॉन्फिगरेशनमध्ये झालेल्या बदलांमुळे व्हॉट्सअॅपसारख्या सेवांवर परिणाम होतो.
डिस्ट्रिब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिस (DDoS) हल्ला: अनेकदा सायबर हल्ल्यांमुळे (DDoS) सर्व्हरवर प्रचंड लोड येतो, ज्यामुळे सेवा ठप्प होते.