फोल्डेबलपेक्षा भारी एक्सपांडेबल डिस्प्ले असलेल्या फोनवर Vivo करतेय काम; डिजाइन आली समोर
By सिद्धेश जाधव | Updated: December 4, 2021 15:25 IST2021-12-04T15:24:53+5:302021-12-04T15:25:58+5:30
Vivo एक्सपांडेबल डिस्प्ले असलेल्या स्मार्टफोनवर काम करत आहे. यासाठी कंपनीनं एक पेटंट रजिस्टर केलं आहे.

(प्रतीकात्मक फोटो सौजन्य: Letsgo digital)
Vivo एका अनोख्या स्मार्टफोनवर काम करत आहे, ज्याचा डिस्प्ले गरजेनुसार वाढवता येईल. हा फोन OPPO X 2021 या OPPO च्या रोलेबल स्मार्टफोन सारखा असेल. विवोनं या फोनसाठी एक पेटंटची नोंदणी केली आहे. यावर्षी मे महिन्यात कंपनीनं WIPO (World Intellectual Property Organisation) कडे हे पेटंट फाईल केलं होतं. आता हे पेटंट पब्लिश करण्यात आलं आहे.
91मोबाईल्सनं या पेटंट डिटेल्समध्ये Vivo च्या आगामी स्मार्टफोनचे चित्र स्पॉट केले आहे. या चित्रावरून फोनच्या डिजाईनची माहिती मिळते. त्यानुसार या फोनच्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल. तसेच डिस्प्लेचा आकार कमी जास्त करण्यासाठी एक्सटेंड होणारा हिंज दिसत आहे. तसेच फ्रंट पॅनलवर एक्सपांडेबल डिस्प्लेच्या उजवीकडे पंच-होल देण्यात आला आहे, ज्यात सेल्फी कॅमेरा मिळेल. फोनच्या उजव्या पॅनलवर USB Type C चार्जिंग पोर्ट आणि वरच्या बाजूला स्पिकर ग्रिल आहे.
सॅमसंगच्या फोल्डेबल स्मार्टफोन्सला उत्तर देण्यासाठी बीबीके इलेक्ट्रॉनिक्सचे ब्रँड तयारी करत आहेत. यात ओप्पो, रियलमी आणि वनप्लसच्या फोल्डेबल फोन्सच्या बातम्या आल्या आहेत. Vivo चा हा एक्सपांडेबल डिस्प्लेचा असलेला फोन याच मोहिमेचा भाग असू शकतो. ज्याचा वापर व्हिडीओ बघण्यासाठी, गेमिंग, रीडिंग इत्यादी कामांसाठी करता येईल. सध्या हा फक्त एक पेटंट आहे, त्यामुळे जोपर्यंत हा फोन अस्तित्वात येत नाही तोपर्यंत यावर जास्त बोलता येणार नाही.