- नीरजालेखिका धारणपणे दहा-बारा वर्षांपूर्वी स्मार्टफोन्स आले आणि सर्वसामान्य माणसाचं जगही बदललं. स्मार्टफोन्स जे केवळ कॉर्पोरेट आणि श्रीमंत लोकांच्या आवाक्यात होते ते हळूहळू सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यात आले. मग फेसबुक आणि व्हॉट्सॲप लोकप्रिय झालं आणि लोकांना गॉसिप, वाद, चर्चा करायला हक्काची चावडी मिळाली.
तुम्ही फेसबुकवर आहात ना, असा प्रश्न नुकतीच ओळख झालेल्या माणसालाही विचारला जाऊ लागला आणि जो नसेल त्याच्याकडे आदिम काळातील एखादी व्यक्ती असावी, असं आश्चर्यानं पाहिलं जाऊ लागलं. सुरुवातीला या फेसबुकचा उपयोग एकमेकांच्या भेटीगाठींसाठी व्हायला लागला. विशेषतः खूप पूर्वी हरवलेले शाळेतले, महाविद्यालयातले किंवा ज्या चाळीत एकत्र राहत होते ते जरा बऱ्या घरात शिफ्ट झालेले मित्र शोधण्यासाठी होत होता. भेटल्यावर आनंदानं रियुनिअन करण्याची टूम निघाली होती त्या काळात. पण गेल्या दहा वर्षात याचा उपयोग वेगवेगळ्या कारणांनी व्हायला लागला. एकेकाळी म्हणजे साठ-सत्तरच्या दशकात जन्मलेले जे लोक साहित्य, नाटक, कला, संगीत यांचा आस्वाद घेत होते, ते लोक आता त्यांचा वेळ घालवण्यासाठी फेसबुकवर वेळ घालवायला लागले. आठवणी, त्या त्या दिवसातल्या काही महत्त्वाच्या घटना, त्यातून आलेला नॉस्टाल्जिया यात रमायला लागले. कधी शेसव्वाशे शब्दात तर कधी तीनचारशे शब्दात मनात येईल ते लिहायला लागले. सगळेच लेखक झाले आणि वाचक हरवून गेले. जे लिहीत नव्हते ते लिहिलेले हे शब्द इथून तिकडे पोचवणारे निरोपे झाले. रात्रंदिवस मोबाईल हातात घेऊन बसणारे लोक आता आपल्या आजूबाजूला दिसत असतात. रस्त्यातून चालताना, ट्रेन बस, एसटी, विमान, कशातूनही प्रवास करताना, रस्त्याच्या कडेला बाईक लावून तर कधी शेताच्या मेरांवर बसून लोक काहीतरी पाहताना, नाहीतर क्वचित काहीतरी वाचताना दिसत असतात.
एका दिवसात दोनशे पानं वाचून संपवणारी आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा ग्रंथालयात जाऊन दुसरं पुस्तक बदलून आणणारी आमच्या पिढीतली माणसंही या उद्योगात सामील झाली. शंभर-दोनशे शब्दात अत्यंत चमकदार शब्दात लिहिलेल्या सोसण्याच्या कथा, कधी नव्या पिढीला दिलेले सल्ले तर कधी कवितांचा पाऊस या फेसबुक नामक चावडीवर पडायला लागला आणि माणसं त्यातच गुंतून गेली.
केवळ गुंतून गेली असं नाही तर तोच इतिहास, तोच भूगोल, तेच साहित्य आणि तेच सत्य असंही मानायला लागली. आता हजार पानांची किंवा त्याहूनही जास्त पानं असलेली दोन-दोन खंडात विभागल्या गेलेल्या ‘वार अँड पीस’ किंवा ‘अना कॅरेनिना’ सारख्या टॉलस्टायच्या कादंबऱ्या किंवा ‘दास कॅपिटल’ सारखा कार्ल मार्क्सचा ग्रंथ, ‘१९८४’ सारखी मुराकामीची तेराशे पानांची कादंबरी किंवा ‘बदलता भारत’ सारख्या अतिशय महत्त्वाच्या दोन खंडातील वैचारिक लेख वाचण्याची लोकांची क्षमता संपत चालली आहे. विचार करायला लावणारं आणि बौद्धिक किंवा वैचारिक समज वाढवणारं साहित्यिक खाद्य वाचनालयांच्या रॅकवर धूळ खात पडायला लागलं आहे आणि भडकवणारं, लोकांना हिंस्र करणारे चार ओळींचे संदेश लोकप्रिय होत चालले आहेत.
अशा काळात अनेकदा एक प्रकारची पोकळी निर्माण होते. लोक केवळ निरर्थक करमणुकीत, रिल्स पाहण्यात वेळ घालवायला लागतात. आता ना दोन अंकी नाटक पाहण्याइतका वेळ आहे आपल्याकडे की दोन तासांचा सलग साहित्यिक वैचारिक कार्यक्रम ऐकण्यासाठी वेळ आहे.
अशा या दिवसांत काही सन्माननीय अपवाद वगळता काहीही अर्थपूर्ण प्रसवू न शकणाऱ्या लोकांचं पीक वाढत चाललं आहे. ते असंच वाढत गेलं तर सर्जनशील जमीन बंजर, मूल्यहीन होऊन जाईल. साहित्य कलांमध्येही चमकदार लेखन करणारे लोक पुढे येतील आणि खोल तळाशी नेणारं आयुष्याच्या गुंतागुंतीची जटिल वाट धुंडाळणारं, त्यावर वैचारिक मांडणी करणारं लेखन संपून जाईल.