आपली देसी जुगाडू वृत्ती कधी कधी मोठे नुकसान करू शकते. जसे की तुटलेले चार्जर वापरणे, चिकटपट्टी लावून काम चालवून नेणे, डुप्लिकेट चार्जर विकत घेऊन पैसे वाचवणे, या सवयी तात्पुरते पैसे वाचवत पण भविष्यात मोठा खर्च निर्माण करतील हे नक्की. त्यासाठी कोणती सावधगिरी बाळगायला हवी ते जाणून घेऊ.
जर तुमच्या चार्जरची वायर कुठेतरी कापली गेली असेल तर ती बदलण्याऐवजी त्यावर सेलोटेप लावून वापरण्याची अनेकांना सवय असते. कापलेल्या किंवा तुटलेल्या चार्जिंग वायरचा वापर केल्याने तुमच्या फोनचे नुकसान तर होतेच पण तुमच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण होऊ शकतो. कसा ते जाणून घेऊ.
शॉक आणि आग लागण्याची भीती
चार्जरच्या तुटलेल्या वायरमधील तारांमुळे शॉक सर्किट होऊ शकते. याशिवाय, चार्जिंग करताना चुकून फोनमध्ये पाणी शिरल्यास मोठा झटका लागू शकतो. त्यामुळे चार्जर नेहमी सुस्थितीतलेच वापरावे, तात्पुरती डागडुजी करून वापरू नये.
बॅटरी खराब होण्याची भीती
चार्जरची केबल तुटली असेल तर त्यातील तारांमुळे योग्यरित्या विद्युतप्रवाह हस्तांतरित होत नाही. यामुळे, स्मार्टफोनची बॅटरी हळूहळू खराब होऊ शकते किंवा लवकर संपू शकते. अशा परिस्थितीत तुम्हाला फोन पुन्हा पुन्हा चार्ज करावा लागू शकतो. कालांतराने नवीन फोन घ्यावा लागू शकतो, त्यापेक्षा वेळेत चांगला चार्जर घेणे हितावह ठरते.
स्फोट होण्याची भीती :
खराब झालेल्या किंवा तुटलेल्या चार्जिंग केबलचा वापर केल्याने फोन जास्त गरम होऊ शकतो. अशा परिस्थितीत फोन ब्लास्ट होण्याचा धोकाही वाढतो. तुटलेल्या केबल्समुळे वीजपुरवठा खंडित होतो. ज्यामुळे फोन गरम होतो किंवा काम करण्यास त्रास होतो.
चार्जिंग स्पीड कमी :
कापलेल्या वायरचा वापर केल्याने फोनचा चार्जिंग स्पीड बराच काळ कमी होऊ शकतो. यामुळे, फोन चार्ज होण्यास जास्त वेळ लागू शकतो. तसेच अशा वापरामुळे फोन लवकर खराब होण्याची भीती वाढते. त्यामुळे काळजी घ्या आणि चार पैसे गेले तरी तुटलेल्या केबरचे चार्जर वापरण्याची चूक करू नका.