स्वाईपचा किफायतशीर फोर-जी टॅबलेट
By Sunil.patil | Updated: October 30, 2017 13:05 IST2017-10-30T13:05:01+5:302017-10-30T13:05:11+5:30
स्वाईप कंपनीने फोर-जी नेटवर्क असणारा स्लेट प्रो फोर-जी हा टॅबलेट ८,४९९ रूपये मूल्यात भारतीय बाजारपेठेत सादर करण्याची घोषणा केली आहे.

स्वाईपचा किफायतशीर फोर-जी टॅबलेट
स्वाईप स्लेट प्रो फोर-जी हा टॅबलेट शँपेन गोल्ड या रंगाच्या पर्यायात ग्राहकांना फ्लिपकार्ट या शॉपिंग पोर्टलवरून उपलब्ध करून देण्यात आला आहे. याची खासियत म्हणजे यातील दोन्ही सीमकार्डला फोर-जी व्हिओएलटीई नेटवर्क सपोर्ट देण्यात आला आहे. अर्थात जिओसह अन्य सेवांचा उपयोग यावर करता येणार आहे. यात अमर्याद व्हाईस कॉलिंग तसेच वेगवान इंटरनेटचा आनंद घेता येईल.
स्वाईप स्लेट प्रो फोर-जी हा टॅबलेट १०.१ इंच आकारमानाच्या आणि एचडी (१२८० बाय ८०० पिक्सल्स) क्षमतेच्या डिस्प्लेने सज्ज आहे. यात क्वाडक-कोअर प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम दोन जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने ३२ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. हा टॅबलेट ५,००० मिलीअम्पिअर क्षमतेच्या बॅटरीने सज्ज आहे. ही बॅटरी दीर्घ काळापर्यंत टिकणारी असून मल्टी-टास्कींगसाठी उपयुक्त असल्याचे स्वाईपतर्फे नमूद करण्यात आले आहे. एलईडी फ्लॅशसह यातील मुख्य कॅमेरा ५ मेगापिक्सल्सचा असेल. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात २ मेगापिक्सल्सचा कॅमेरा दिलेला आहे.
स्वाईप स्लेट प्रो फोर-जी हा टॅबलेट हा टॅबलेट अँड्रॉइडच्या मार्शमॅलो या आवृत्तीवर चालणारा आहे. सध्या बहुतांश टॅबलेट हे नोगट या आवृत्तीवर चालणारे असतांना हे मॉडेल आधीच्या आवृत्तीवर आधारित असल्याची बाब लक्षात घेणे गरजेचे आहे. हा या मॉडेलचा मायनस पॉइंट ठरू शकतो. कनेक्टिव्हिटीसाठी यात यात ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी, ऑडिओ जॅक आदी फिचर्स असतील. तर यात अॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप व प्रॉक्झिमिटी सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत.