सेल्फी स्पेशल विवो व्ही5एस झाला स्वस्त, मूल्यात दोन हजार रूपयांनी कपात
By शेखर पाटील | Updated: December 12, 2017 11:43 IST2017-12-12T10:22:29+5:302017-12-12T11:43:12+5:30
विवो व्ही5 एस या तब्बल 20 मेगापिक्सल्स फ्रंट कॅमेरा असणार्या स्मार्टफोनच्या मूल्यात दोन हजार रूपयांनी कपात करण्यात आली आहे.

सेल्फी स्पेशल विवो व्ही5एस झाला स्वस्त, मूल्यात दोन हजार रूपयांनी कपात
विवो व्ही5एस हे मॉडेल मार्च महिन्यान भारतीय बाजारपेठेत उतारण्यात आले होते. याचे मूल्य 18 हजार 990 रूपये होते. यानंतर याचे मूल्य एक हजार रूपयांनी कमी करण्यात आले होते. तर आता हाच स्मार्टफोन ग्राहकांना अजून दोन हजार रूपये कमी मूल्यात म्हणजेच 15 हजार 990 रूपयात खरेदी करता येणार आहे. विवो व्ही5एस या मॉडेलची खासियत म्हणजे यात मूनलाईट फ्लॅशसह तब्बल 20 मेगापिक्सल्स क्षमतेचा फ्रंट कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. यात फेस ब्युटी 6.0 या फिचरच्या मदतीने उत्तम दर्जाचे सेल्फी घेता येतील. तर ग्रुप सेल्फीसाठीही यात स्वतंत्र मोड प्रदान करण्यात आला आहे. तर याचा मुख्य कॅमेरा हा 13 मेगापिक्सल्स क्षमतेचा असेल.
विवो व्ही५एस मॉडेलमध्ये 5.5 इंच आकारमानाचा आणि एचडी म्हणजेच 1280 बाय 720 पिक्सल्स क्षमतेचा 2.5 डी वक्राकार ग्लास डिस्प्ले असून यावर कॉर्निंग गोरीला ग्लासचे संरक्षण आवरण आहे. याची रॅम चार जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज 64 जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने 256 जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा दिलेली आहे. यात फिंगरप्रिंट स्कॅनर प्रदान करण्यात आला असून या मॉडेलमध्ये स्प्लिट स्क्रीनची सुविधाही असेल. तर यातील बॅटरी 3000 मिलीअँपिअर प्रति-तास इतक्या क्षमतेची दिलेली आहे.
विवो व्ही5एस या मॉडेलमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी फोर-जी व्हिओएलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यु-टुथ, वाय-फाय तर अन्य फिचर्समध्ये जीपीएस, युएसबी, युएसबी-ओटीजी, अॅक्सलेरोमीटर, लाईट सेन्सर, डिजीटल कंपास, एके4376 ऑडिओ चीपयुक्त हाय-फाय ऑडिओ प्रणाली आदींचा समावेश असेल. हा स्मार्टफोन ग्राहकांना फ्लिपकार्टवरून खरेदी करता येणार आहे.