अमेझॉनवर ऑनर ७ एक्सच्या नोंदणीस प्रारंभ
By शेखर पाटील | Updated: November 20, 2017 15:00 IST2017-11-20T15:00:00+5:302017-11-20T15:00:00+5:30
ड्युअल कॅमेरा सेटअप असणारा ऑनर ७ एक्स हा स्मार्टफोन लवकरच भारतीय ग्राहकांना मिळणार असून याची अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून अगावू नोंदणी सुरू झाली आहे.

अमेझॉनवर ऑनर ७ एक्सच्या नोंदणीस प्रारंभ
ड्युअल कॅमेरा सेटअप असणारा ऑनर ७ एक्स हा स्मार्टफोन लवकरच भारतीय ग्राहकांना मिळणार असून याची अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून अगावू नोंदणी सुरू झाली आहे.
हुआवे कंपनीच्या मालकीच्या ऑनर या ब्रँडने अलीकडेच चीनमध्ये ऑनर ७ एक्स हा स्मार्टफोन लाँच केला आहे. येत्या काही दिवसांमध्ये हे मॉडेल भारतीय बाजारपेठेत सादर करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमिवर, अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून याची अॅडव्हान्स बुकींग सुरू झाली आहे. यासोबत अमेझॉनने काही ऑफर्सदेखील देऊ केल्या आहेत. यात अगावू नोंदणी ग्राहकांना या मॉडेलसोबत इयरफोन व पॉवरबँक देण्यात येणार आहे. तर यात्रा.कॉम या पोर्टलतर्फे लकी ड्रॉ काढण्यात येणार असून यातील विजेत्यांना सुमारे ७५ हजारांपर्यंतचे बक्षीस देण्यात येणार आहे. ऑनर ७ एक्स या स्मार्टफोनचे मूल्य जाहीर करण्यात आले नसले तरी ती २० हजारांच्या आसपास असेल असे मानले जात आहे. अर्थात हा मध्यम किंमतपट्टयातील स्मार्टफोन असेल.
ऑनर ७ एक्स या मॉडेलमध्ये १८:७ अस्पेक्ट रेशोयुक्त ५.९३ इंच आकारमानाचा आणि १९२० बाय १२८० पिक्सल्स म्हणजेच फुल एचडी क्षमतेचा २.५ डी डिस्प्ले असेल. ऑक्टा-कोअर किरीन ६५९ प्रोसेसरने सज्ज असणार्या या स्मार्टफोनची रॅम ४ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेजसाठी ३२/६४ जीबी असे दोन पर्याय असतील. या दोन्ही व्हेरियंटमध्ये मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने स्टोअरेज वाढविता येणार आहे. वर नमूद केल्यानुसार ऑनर ७ एक्स मॉडेलमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप असेल. यातील मागील बाजूस १६ व २ मेगापिक्सल्सचे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. यातील एक आरजीबी तर दुसरा मोनोक्रोम या प्रकारातील असेल. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात ८ मेगापिक्सल्सचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर आधारित इएमयुआय ५.१ या ऑपरेटींग सिस्टीमवर चालणारा असेल. तर यात ३३४० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आलेली आहे.