भारतासह जगभरातील आघाडीच्या देशांमध्ये 5 जीच्या स्वागताची तयारी जोरदार सुरू आहे. काही क्षणांत काही जीबी डेटा डाऊनलोड करण्याचा स्पीड भन्नाट वेग पकडणार आहे. अशातच मोबाईल कंपन्यांसोबत ऑटोमोबाईल कंपन्यांनीही कंबर कसली आहे. भारतात तर इंटरनेटवाली कारही लाँच झाली आहे. दक्षिण कोरियामध्येतर 5 जीचा वापरही सुरू झाला आहे. तर चीनमध्ये परवानगी मिळाली आहे.
5 जी तंत्रज्ञानामुळे काही सेकंदांमध्ये मोठमोठ्या फाईल डाऊनलोड होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या दरम्यान, 5 जीमुळे प्राण्यांसह लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या नेटवर्कमुळे कॅन्सर सारखा आजार किंवा नपुसंकत्व येण्याची गंभीर शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
५ जी ची भीती सर्व मोबाईलमध्ये विद्युत चुंबकीय लहरींचा वापर केला जातो. या लहरींबाबत विविध देशांमध्ये विविध मतप्रवाह आहेत. काही तज्ज्ञांच्या मते 5 जी मुळे कॅन्सर होऊ शकतो. तर 2014 मध्ये डब्ल्यूएचओने सांगितले होते की, मोबाईल फोनमुळे कोणताही धोका नाही. मात्र, याच डब्ल्यूएचओने आंतरराष्ट्रीय कर्करोग संशोधन संस्था (IARC) च्या हवाल्याने सांगिले आहे की रेडिओ फ्रिक्वेन्सी रेडिएशनमुळे कॅन्सरचा धोका असल्याचे म्हटले होते. मोबाईमध्येही हीच फ्रिक्वेन्सी वापरली जाते.