नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपूर्वी जिओनं बाजारात येऊन अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. जिओनं ग्राहकांसाठी नवनव्या योजना उपलब्ध करून दिल्यानं अनेक ग्राहकांच्या जिओवर उड्या पडत आहेत. त्यातच जिओ ही कंपनी नेटवर्कच्या बाबतीतही नंबर वन ठरली आहे. उत्पन्नाच्या बाबतीतही रिलायन्स जिओ इन्फोकॉम ही कंपनी देशातील दुसरी सर्वात मोठी कंपनी म्हणून समोर आली आहे. महसूल बाजार हिस्सा(आरएमएस)च्या अहवालानुसार रिलायन्सनं आता व्होडाफोन इंडियाची जागा घेतली आहे. त्यातच महसुलाच्या बाबतीत रिलायन्स जिओनं व्होडाफोनला पछाडलं आहे. उत्पन्नाच्या बाबतीत भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओ एकाच पातळीवर आले आहेत. देशातल्या खेड्यापाड्यात पोहोचलेल्या जिओनं ग्राहकांना फारच क्षुल्लक शुल्कामध्ये 4जी सेवा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळेच ग्राहकांमध्ये जिओची प्रचंड लोकप्रियता वाढली आहे. तसेच दिवसेंदिवस वाढत्या ग्राहकांमुळे कंपनीलाही मोठ्या प्रमाणात फायदा पोहोचत आहे. 4जी लाँच केल्यानंतर जिओचे शेअर्स वधारलेजिओनं 4जी सेवा लाँच केल्यानंतर रिलायन्सच्या शेअर्सनं जबरदस्त उसळी घेतली. जून 2018च्या तिमाहीत जिओचे शेअर्स 22.4 टक्क्यांवर पोहोचले होते. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या माहितीनुसार, या वर्षीच्या तिमाहीच्या पहिल्या टप्प्यात शेअर्समध्ये 2.53 टक्के वाढ झाली आहे. तसेच व्होडाफोन आरएमएस जूनच्या तिमाहीच्या मुकाबल्यात 1.75 टक्क्यांची घट झाली आहे. कुमार मंगलम बिर्ला यांच्या आयडिया सेल्युलर कंपनीमध्येही 1.06 टक्क्याची घट नोंदवली गेली आहे. एअरटेल भारतीच्या शेअर्समध्ये 0.12 टक्के घट आली आहे. आयडिया आणि व्होडाफोनचं विलीनीकरण झाल्यानंतर व्होडाफोन ही टेलिकॉम सेक्टरमधली सर्वात मोठी कंपनी म्हणून समोर येणार आहे. आयडियाचं व्होडाफोनमध्ये विलीनीकरण झाल्यानंतर व्होडाफोन ही नंबर वन कंपनी बनणार आहे. तर भारती एअरटेल दोन नंबरवर राहणार आहे. तसेच जिओ तिसरा क्रमांक मिळवणार आहे.
उत्पन्नामध्ये देशातील सर्वात मोठी दुसरी कंपनी ठरली रिलायन्स जिओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 17:15 IST