लवकरच येणार ड्युअल फ्रंट कॅमेर्यांनी सज्ज ओप्पो एफ ५
By शेखर पाटील | Updated: October 13, 2017 12:48 IST2017-10-13T11:55:40+5:302017-10-13T12:48:27+5:30
ओप्पो कंपनीने खास सेल्फी प्रेमींसाठी दोन फ्रंट कॅमेर्यांनी युक्त असणारा ओप्पो एफ ५ हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना सादर करण्याचे जाहीर केले आहे. भारतीय बाजारपेठेत सेल्फी केंद्रीत स्मार्टफोनची लोकप्रियता वाढू लागली आहे

लवकरच येणार ड्युअल फ्रंट कॅमेर्यांनी सज्ज ओप्पो एफ ५
ओप्पो कंपनीने खास सेल्फी प्रेमींसाठी दोन फ्रंट कॅमेर्यांनी युक्त असणारा ओप्पो एफ ५ हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना सादर करण्याचे जाहीर केले आहे. भारतीय बाजारपेठेत सेल्फी केंद्रीत स्मार्टफोनची लोकप्रियता वाढू लागली आहे. अनेक कंपन्यांनी उत्तमोत्तम फ्रंट कॅमेर्यांची सुविधा असणारे मॉडेल्स लाँच केले असून याला उत्तम प्रतिसाद लाभला आहे. या पार्श्वभूमिवर ओप्पो एफ ५ हा स्मार्टफोन लवकरच भारतीय ग्राहकांना सादर करण्यात येणार आहे. याची खासियत म्हणजे या मॉडेलमध्ये ड्युअल फ्रंट कॅमेरे देण्यात आले आहेत.
हे दोन्ही कॅमेरे तब्बल १२ मेगापिक्सल्स क्षमतांचे असतील. यात आर्टीफिशियल इंटिलेजियन्स अर्थात कृत्रीम बुध्दीमत्तेने युक्त असणारे एआय ब्युटि रिकग्नेशन हे फिचर देण्यात आले आहे. याच्या मदतीने हा कॅमेरा सेल्फी घेणार्या युजरचे वय, त्वचेचा रंग, लिंग आदी बाबींना ओळखू शकतो. याला दोन्ही कॅमेर्यांच्या एकत्रीत इफेक्टची जोड देण्यात आल्यामुळे दर्जेदार सेल्फी काढता येतील असा कंपनीचा दावा आहे. तर यातील मुख्य कॅमेरा हा फेज डिटेक्शन ऑटो-फोकस व एलईडी फ्लॅशसह २० मेगापिक्सल्स क्षमतेचा असून याच्या मदतीने फुल एचडी क्षमतेचे चित्रीकरण करता येणार आहे. याशिवाय यात जिओ-टॅगींग, एचडीआर, पॅनोरामा, टच फोकस, फेस डिटेक्शन आदी फिचर्स असतील.
ओप्पो एफ ५ या स्मार्टफोनमध्ये बहुतांश फ्लॅगशीप मॉडेल्सप्रमाणे १८:९ गुणोत्तर असणारा कडा विरहीत फुल डिस्प्ले असेल. हा डिस्प्ले ६ इंच आकारमानाचा आणि २१६० बाय १०८० पिक्सल्स म्हणजेच फुल एचडी क्षमतेचा असून यावर कॉर्निंग गोरीला ग्लास ५ चे संरक्षक आवरण असेल. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ६६० प्रोसेसर असेल. या मॉडेलची रॅम सहा जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबीपर्यंत वाढविणे शक्य असेल. हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारे आहे. तर यात ४,००० मिलीअँपिअर इतक्या क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आली आहे. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तर यात अॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत.
ओप्पो एफ ५ हे मॉडेल भारतासह आशियातील सहा देशांमध्ये २६ ऑक्टोबर रोजी लाँच करण्यात येणार आहे. ओप्पो कंपनीने या संदर्भात टिझरदेखील जारी केला आहे. यात या स्मार्टफोनचे मूल्य देण्यात आले नसले तरी ते अन्य फ्लॅगशीप मॉडेल्सच्या तुलनेत कमी असेल अशी शक्यता आहे.