मोटो जी 5 एसची नवीन आवृत्ती
By शेखर पाटील | Updated: October 16, 2017 11:14 IST2017-10-16T11:12:11+5:302017-10-16T11:14:54+5:30
मोटोरोलाने भारतात आपल्या मोटो जी ५ एस या मॉडेलची ‘मिडनाईट ब्ल्यू’ ही आवृत्ती सादर केली असून हा स्मार्टफोन ग्राहकांना ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही पध्दतींमध्ये सादर करण्यात आला आहे.

मोटो जी 5 एसची नवीन आवृत्ती
लेनोव्होची मालकी असणार्या मोटोरोला मोबॅलिटी या कंपनीने ऑगस्ट महिन्यात भारतीय ग्राहकांना मोटो जी ५ एस आणि मोटो जी ५ एस प्लस हे दोन स्मार्टफोन सादर केले होते. आता यातील मोटो जी ५ एस या मॉडेलची ‘मिडनाईट ब्ल्यू’ ही नवीन आवृत्ती उपलब्ध करण्यात आली आहे. याचे मूल्य १४,९९९ रूपये असले तरी ग्राहकांना हे मॉडेल १२,९९९ रूपये मूल्यात खरेदी करण्याची सूट देण्यात आली आहे. नावातच नमूद असल्यानुसार या स्मार्टफोनचा रंग मिडनाईट ब्ल्यू असेल. यातील अन्य फिचर्स मात्र आधीप्रमाणेच असतील. अर्थात मोटो जी ५ एसमध्ये ५.२ इंच आकारमानाचा आणि १९२० बाय १०८० पिक्सल्स म्हणजेच फुल एचडी क्षमतेचा अमोलेड डिस्प्ले असून यावर कॉर्निंग गोरीला ग्लास ३ चे संरक्षक आवरण असेल. मोटो जी ५ एसमध्ये ऑक्टॉ-कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४३० प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम तीन जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून हे स्टोअरेज मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविता येणार आहे.
मोटो जी ५ एसच्या या नवीन आवृत्तीत १६ मेगापिक्सल्सचा मुख्य तर ८ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये टर्बो पॉवर चार्जरसह ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी आहे. हे दोन्ही स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ७.१.१ नोगट या आवृत्तीवर चालणारे आहेत. यात फिंगरप्रिंट स्कॅनरसह वाय-फाय, ब्ल्यू-टुथ, जीपीएस/ए-जीपीएस, एनएफसी, युएसबी टाईप-सी, ऑडिओ जॅक, फोर-जी व्हिओएलटीई नेटवर्क सपोर्ट आदी फिचर्स देण्यात आले आहेत.