बहुप्रतिक्षित आयफोन १७ मालिका आजपासून भारतासह जगभरात विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. या निमित्ताने मुंबईतील बीकेसी येथील अॅपल स्टोअरबाहेर पहाटेपासूनच ग्राहकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली, ज्याचा व्हिडीओ ANI वृत्तसंस्थेने त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरून शेअर केला आहे.
दरम्यान, ९ सप्टेंबर रोजी अॅपलने 'अवे ड्रॉपिंग' कार्यक्रमात आयफोन १७ मालिकेचे चार मॉडेल्स आयफोन १७, आयफोन एअर, आयफोन १७ प्रो आणि आयफोन १७ प्रो मॅक्स लॉन्च केले आहेत. आजपासून या सर्व मॉडेल्सची विक्री भारतातही सुरू झाली.
ग्राहकांचा उत्साह प्रचंड असून, काही जण विशेषतः आयफोन खरेदीसाठी इतर शहरांतून मुंबईत दाखल झाले आहेत. अहमदाबादचे रहिवासी मनोज यांनी सांगितले की, ते दरवेळी आयफोन खरेदीसाठी अहमदाबादहून मुंबईला येतात. यंदाही त्यांनी पहाटे ५ वाजल्यापासून स्टोअरबाहेर रांगेत उभे राहून आयफोन १७ खरेदीसाठी रांगा लागली आहे.
किंमत किती आहे?आयफोन १७ ची २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ८२ हजार ९०० रुपये आहे. आयफोन एअरची किंमत १ लाख १९ हजार ९०० रुपये आहे. आयफोन १७ प्रो आणि आयफोन १७ प्रो मॅक्स अनुक्रमे १ लाख ३४ हजार ९०० रुपये आणि १ लाख ४९ हजार ९०० रुपयांत उपलब्ध आहे. कंपनीने सर्व फोन २५६ जीबीच्या बेस व्हेरिएंटमध्ये लॉन्च केले आहेत.काही देशांमध्ये, ऑनलाइन प्री-ऑर्डर दरम्यान आयफोन १७ प्रो आणि १७ प्रो मॅक्स विकले गेले, ज्यामुळे ऑक्टोबरपर्यंत डिलिव्हरी लांबल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, ग्राहक अजूनही थर्ड-पार्टी स्टोअरमधून आयफोन १७ खरेदी करू शकतात.