एलजी जी ७ थिनक्यू मॉडेलची घोषणा
By शेखर पाटील | Updated: May 4, 2018 12:46 IST2018-05-04T12:46:07+5:302018-05-04T12:46:07+5:30
यामध्ये ६.१ इंच आकारमानाचा आणि क्युएचडी प्लस म्हणजे ३१२० बाय १४४० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले देण्यात आला आहे.

एलजी जी ७ थिनक्यू मॉडेलची घोषणा
एलजी कंपनीने आपला जी७ थिनक्यू हा फ्लॅगशीप श्रेणीतील स्मार्टफोन जागतिक बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून यात फुल व्ह्यू डिस्प्ले व दर्जेदार कॅमेर्यांसह अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून एलजी जी७ थिनक्यू या मॉडेलबाबत जगभरात प्रचंड औत्सुक्याचे वातावरण निर्मीत झाले होते. या पार्श्वभूमीवर, न्यूयॉर्क शहरात आयोजित कार्यक्रमात एलजी कंपनीने आपल्या या उच्च श्रेणीतील स्मार्टफोनचे अनावरण केले. यामध्ये ६.१ इंच आकारमानाचा आणि क्युएचडी प्लस म्हणजे ३१२० बाय १४४० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले १५:५:९ या अस्पेक्ट रेशोने युक्त असून याच्या वरील बाजूस आयफोन एक्स या मॉडेलप्रमाणे नॉच देण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे हा नॉच बाजूला सारून याला खर्या अर्थाने फुल व्ह्यू या प्रकारात वापरण्याची सुविधादेखील यात आहे. यामध्ये क्वॉलकॉमचा अतिशय गतीमान असा स्नॅपड्रॅगन ८४५ हा प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम ४ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. याच्या डाव्या बाजूला एक बटन देण्यात आले असून ते एकदा दाबल्यानंतर गुगल असिस्टंट तर दोनदा दाबल्यानंतर गुगल लेन्स अॅक्टीव्हेट होतात. यामध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर असून फेस अनलॉकची सुविधादेखील देण्यात आली आहे. तसेच यात ऑडिओ जॅकदेखील दिलेले आहे.
एलजी जी७ थिनक्यू या मॉडेलच्या मागील बाजूस १६ मेगापिक्सल्स क्षमतांचे दोन कॅमेरे देण्यात आले असून यातील एक आरजीबी तर दुसरा मोनोक्रोम या प्रकारातील असून यांच्या मदतीने उत्तम प्रतिमा घेता येतील. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात ८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. यात वायरलेस चार्जींगच्या सुविधेने युक्त असणारी ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून हे मॉडेल अँड्रॉइडच्या ओरियो या आवृत्तीवर चालणारे आहे. या मॉडेलचे मूल्य आणि उपलब्धता याबाबत कंपनीने माहिती दिली नसली तरी येत्या काही दिवसांमध्ये भारतासह अन्य बाजारपेठांमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध होण्याची शक्यता आहे.