अॅमेझॉनच्या इको उपकरणांवर जंबो डिस्काऊंट
By शेखर पाटील | Updated: November 14, 2017 13:54 IST2017-11-14T13:52:57+5:302017-11-14T13:54:20+5:30
अॅमेझॉनने गेल्या महिन्यात सादर केलेल्या अमेझॉन इको, इको प्लस आणि इको डॉट हे तिन्ही स्मार्ट स्पीकर आता सवलतीच्या दरात ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहेत.

अॅमेझॉनच्या इको उपकरणांवर जंबो डिस्काऊंट
अॅमेझॉनने गेल्या महिन्यात सादर केलेल्या अमेझॉन इको, इको प्लस आणि इको डॉट हे तिन्ही स्मार्ट स्पीकर आता सवलतीच्या दरात ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारपेठेत अॅमेझॉन इको, अॅमेझॉन इको प्लस आणि अॅमेझॉन इको डॉट हे स्मार्ट स्पीकर्स अनुक्रमे ९,९९९; १४,९९९ आणि ४,४९९ रूपये मूल्यात लाँच करण्यात आले होते. तर काही दिवसांपूर्वीच याची प्रत्यक्षात विक्री सुरू झाली आहे. मात्र आता हे तिन्ही उपकरणे अनुक्रमे ६,९९९; १०,४९९ आणि ३,१९९ रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आली आहेत. अर्थात यात ३०००, ४५०० आणि १८०० रूपयांचा डिस्काऊंट देण्यात आला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट देण्याचे कोणतेही कारण अमेझॉनने दिलेले नाही. तसेच ही ऑफर मर्यादीत काळासाठी आहे का? याचा खुलासादेखील केलेला नाही.
अॅमेझॉन कंपनीचा इको म्हणजे लंब गोलाकार आकार असणारा आणि ब्ल्यु-टुथ कनेक्टिव्हिटी असणारा स्मार्ट स्पीकर आहे. यात भोवतीचा आवाज ऐकण्यासाठी संवेदनशील मायक्रोफोन लावण्यात आला आहे. हा घरात कुठेही ठेवला तरी भोवतीचे आवाज ऐकतो. त्याला अलेक्झा असे संबोधन करून कोणतीही आज्ञावली दिल्यानंतर तो त्याचे पालन करतो. कुणीही त्याला आपल्याला हवे ते संगीत वा गीत ऐकण्याची फर्माईश केल्यानंतर तो अमेझॉनवरील संबंधीत गाणे ऐकवतो. कुणी त्याला हवामानाची माहिती वा बातम्या विचारू शकतात. कुणी त्याला कोणताही शब्दाचा अर्थ वा विकीपेडियावरील माहिती विचारल्यानंतर तो संबंधीत व्यक्तीला ती माहिती ऐकवतो. याला घरातील अन्य स्मार्ट उपकरणे कनेक्ट करण्याची सुविधादेखील देण्यात आली आहे. तसेच हे स्मार्ट स्पीकर वाय-फायच्या मदतीने यासाठी तयार करण्यात आलेल्या अॅपशी जोडता येतात.
अमेझॉन इको प्लस या स्मार्ट स्पीकरमध्ये डॉल्बी प्रोसेसींग या तंत्रज्ञानाने सज्ज असणार्या ३६० अंशातील ध्वनीची जोड देण्यात आली आहे. यात घरातील स्मार्ट उपकरणांना कनेक्ट करण्याची प्रणाली देण्यात आली आहे. तर अमेझॉन इको डॉट हे मॉडेल या तिन्हींमध्ये आकारने अत्यंत आटोपशीर असेच आहे. एका अर्थाने ही मूळ मॉडेलची मिनी आवृत्ती आहे. आकाराने लहान असल्यामुळे तो कुठेही सहजपणे वापरता येतो.