जिओफोन बनला नंबर वन
By शेखर पाटील | Updated: May 28, 2018 16:10 IST2018-05-28T16:10:17+5:302018-05-28T16:10:17+5:30
रिलायन्स जिओचा जिओफोन हा आता जगातील सर्वाधीक विकला जाणारा फिचरफोन बनला आहे.

जिओफोन बनला नंबर वन
रिलायन्स जिओचा जिओफोन हा आता जगातील सर्वाधीक विकला जाणारा फिचरफोन बनला आहे.
जगभरात फिचरफोन मोठ्या प्रमाणात विकले जातात. विशेष करून विकसनशील तसेच अविकसित देशांमध्ये याचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो. दरवर्षी सुमारे ५० कोटी फिचरफोन विकले जातात. यामुळे अनेक कंपन्या अतिशय किफायतशीर दरात फिचरफोन लाँच करत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. या पार्श्वभूमिवर, काऊंटरपॉईंट या रिसर्च संस्थेने जानेवारी ते मार्च २०१८ दरम्यान, जगभरात विकल्या गेलेल्या फिचरफोनच्या आकडेवारीवरून एक अहवाल नुकताच जाहीर केला आहे. यात रिलायन्स जिओच्या जिओफोन या मॉडेलने तब्बल १५ टक्क्यांचा वाटा मिळवत प्रथम क्रमांकावर झेप घेतली आहे. जिओफोन हे मॉडेल भारतात अतिशय लोकप्रिय ठरले आहे. ग्राहकांकडून १५०० रूपयांची तीन वर्षांसाठी डिजॉजिट घेऊन हा फिचरफोन ग्राहकांना खरेदी करता येत आहे. याला मिळालेल्या प्रतिसादामुळे या मॉडेलची यशस्वी घोडदौड सुरू आहे. यामुळेच आता हा जगातील पहिला क्रमांकाचा फिचरफोन बनला आहे.
दरम्यान, या यादीत दुसर्या क्रमांकावर नोकिया ब्रँडची मालकी असणार्या एचएमडी ग्लोबल ही कंपनी विराजमान झाली आहे. या कंपनीचा बाजारपेठेतील वाटा १४ टक्के इतका आहे. यानंतर आयटेल कंपनी १३ टक्क्यांसह तिसर्या क्रमांकावर आहेत. यानंतर सॅमसंग व टेक्नो या कंपन्यांचा क्रमांक लागतो.