अनेकांना व्हॉट्सअपवर सकाळी, दुपारी किंवा सायंकाळी कधीही हाय, हॅलो असे मेसेज येतात. हे अनोळखी नंबर असतात, त्यावर एखादे मुलीचे गोंडस नाव दिलेले असते. एखादा रिव्ह्यू किंवा लाईक किंवा अन्य काही तरी करा तुम्हाला पहिल्या टास्कचे १५० रुपये मिळतील असे सांगितले जाते. ही टास्क केल्यावर तुम्हाला ते पैसे तुमच्या अकाऊंटमध्ये मिळतात. पण पुढे मोठा घोळ होतो.
तुम्ही कोणत्याही वेबसाईटवर, अॅपवर तुमचा मोबाईल नंबर लॉगईन केलेला असेल आणि जर त्यांचा डेटा हॅक झाला असेल तर तुमचा डेटा डार्क वेबवर असतो. त्यात तुमचा मोबाईल नंबर, नाव, मेल आयडी, जन्म दिनांक, पत्ता आणि पासवर्डही असतो. यामुळे हे लोक तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात. ते तुम्हाला मेसेज करतात आणि प्रलोभन दाखवितात.
सुरुवातीला तुम्हाला १५० रुपये सांगितल्याप्रमाणे देतात आणि मग पुढे तुमच्यासोबत स्कॅम होतो व तुमचे अकाऊंट धुपले जाते. घरात बसून पैसे मिळतात, फक्त काय एक व्हिडीओ तर पहायचा आहे, एखाद्या कंपनीला ती चांगली आहे, असा रिव्ह्यू तर द्यायचा आहे असे म्हणून तुम्ही तुमचे पैसे धोक्यात टाकता. दिवसाला तुम्हाला १०००, २००० रुपये मिळतील अशी आशा दाखविली जाते, त्यात तुम्ही फसता आणि हाती असलेले पैसेही गमावून बसता.
यामुळे या रिव्हू देण्याच्या किंवा व्हिडीओ पाहण्याच्या मेसेजना रिप्लाय देऊ नका. तो नंबर ब्लॉक करून टाका. म्हणजे तुमचे अकाऊंट सेफ राहिल. तसेच त्या नंबरवरून आलेली इमेज किंवा कोणतीही फाईल डाऊनलोड करू नका. असे केल्याने तुमच्या मोबाईलमध्ये ते मालवेअर इन्सटॉल करण्यात यशस्वी ठरतात आणि नंतर तुम्हाला ते फसवू शकतात. सध्या सर्वांचे आयुष्य त्या मोबाईलमध्ये असते. गोपनिय डॉक्युमेंट, अकाऊंट डिटेल्स, खासगी मेसेज, युपीआय अॅप्स आदी गोष्टी त्या मोबाईलमध्ये असतात. यामुळे तुमचा मोबाईल खूप महत्वाचा असतो. एखादा अँटीव्हायरस तुम्ही मोबाईलमध्ये टाकू शकता. जो तुम्हाला वर्षाला २०० रुपयांनाही मिळतो.