पेन्शन वितरणातील सुधारणेवर भर
By Admin | Updated: July 31, 2015 23:03 IST2015-07-31T23:03:14+5:302015-07-31T23:03:14+5:30
फोटो ओळ-

पेन्शन वितरणातील सुधारणेवर भर
फ टो ओळ- वायुसेनानगर येथील कमान मुख्यालयात आयोजित रक्षा अदालतीच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करतांना रक्षा लेखा महानियंत्रक एस.एस. मोहंती, व्यासपीठावर विंग कमांडर समीर गंगाखेडकर पेन्शन वितरणातील सुधारणेवर भर रक्षा पेन्शन अदालतीचे उद्घाटन : एस.एस. मोहंती यांचे प्रतिपादन नागपूर : देशाच्या संरक्षण विभागातील रक्षा लेखा नियंत्रण अंतर्गत २५ लाखापेक्षा अधिक लोकांना पेन्शनचा लाभ दिला जातो. माजी अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांनी केलेल्या सेवेनंतर पेन्शनचाच मुख्य आधार असतो. त्यामुळे पेन्शनची रक्कम संबधितांना सहजपणे व तातडीने उपलब्ध व्हावी, या उद्देशाने एकूणच पेन्शन वितरण प्रणालीतच आवश्यक सुधारणा करण्यावर अधिक भर दिला जात आहे, अशी माहिती संरक्षण विभागाच्या रक्षा लेखा महानियंत्रक एस.एस. मोहंती यांनी दिली. वायुसेनानगर येथील भारतीय वायुसेनेच्या मेन्टेनन्स कमान मुख्यालयात रक्षा पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. याप्रसंगी मेन्टेनन्स कमानचे एअर ऑफिसर कमांडिंग इन-चिफ एअर मार्शल जगजीत सिंह मुख्य अतिथी होते. रक्षा लेखा महानियंत्रक मोहंती पुढे म्हणाले, देशात २५ लाख लोकांना आम्ही पेन्शनची सुविधा पुरवितो. पेन्शन वितरणाच्या प्रणालीतच सुधारणा करण्याचे काम सातत्याने सुरू आहे. मेन्टेनन्स कमान यांनी पेन्शन अदालतीसाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. एअर मार्शल जगजीत सिंह यांनी पेन्शन अदालतीमुळे माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना पेन्शन संदर्भात येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यास निश्चित मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी संरक्षण विभागाचे जनसंपर्क अधिकारी विंग कमांडर समीर गंगाखेडकर उपस्थित होते. या पेन्शन अदालतीमध्ये राष्ट्रीयकृत बँक, जिल्हा सैनिक बोर्ड, माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना आणि संरक्षण लेखा विभागातील अनेक लोकांनी भाग घेतला. या अदालतीचा ५०० जणांनी लाभ घेतला.