Elon Musk Name Change : जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि X, Tesla सारख्या कंपन्यांचे प्रमुख Elon Musk सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहेत. ते अनेकदा अशा काही गोष्टी करतात, ज्यामुळे सोशल मीडियावर त्यांची चर्चा होते. आता पुन्हा एकदा त्यांनी अशी गोष्ट केली आहे, ज्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. त्यांनी आपले नाव बदलले आहे. कागदोपत्री नाही, पण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर मस्क यांनी आपले नाव बदलले आहे.
इलॉन मस्क यांनी आपले X वरील नाव बदलून Kekius Maximus, असे केले आहे. त्यांनी आपला प्रोफाईल पिक्चरदेखील बदलला असून, त्याजागी 'पेप द फ्रॉग' मीमचा फोटो लावला आहे. यामध्ये पेप द फ्रॉगने योद्ध्याचे कपडे घातले असून, त्याच्या हातात गेम जॉयस्टिक दिसत आहे. तुमच्यापैकी अनेकांना प्रश्न पडला असेल की, मस्क यांनी आपले नाव का बदलले आणि या नवीन नावाचा नेमका अर्थ काय?
Kekius Maximus म्हणजे काय?इलॉन मस्क यांनी एक्सवर आपल्या नावाऐवजी Kekius Maximus नाव ठेवले आहे. हे एक क्रिप्टोकरन्सी टोकन आहे, जे एथीरियम आणि सोलानावर आधारित आहे. विशेष म्हणजे, इलॉन मस्क यांनी आपले नाव Kekius Maximus ठेवल्यानंतर या टोकनला अचानक गती मिळाली अन् अवघ्या 24 तासात त्याचे मूल्य 500% वाढले. या क्रिप्टोकरन्सी टोकनेचे मूल्य सुमारे 30 लाख रुपयांपर्यंत वाढले आहे. दरम्यान, इलॉन मस्क यांनी यापूर्वी Dogecoin बाबत असेच केले होते. त्यावेळीही या करन्सीचे मूल्य अनेकपटीने वाढले होते.
मीमकॉइन्स म्हणजे काय?Kekius Maximus एक मीमकॉइन असून, क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये एक मोठे नाव म्हणून उदयास आले आहे. Memecoin ही एक क्रिप्टोकरन्सी आहे, जी इंटरनेटवर चालू असलेल्या ट्रेंड किंवा मीम्सपासून प्रेरित आहे. गेल्या काही दिवसांत यासंबंधीच्या हालचाली वाढल्या असून, ते गुंतवणूकदारांना आकर्षित करत आहेत. त्याचे ट्रेडिंग व्हॉल्यूम $2,734,948 पर्यंत वाढले, हे दर्शविते की, गुंतवणूकदार त्यात रस घेत आहेत. 27 डिसेंबर रोजी हा सर्वोच्च पातळीवर पोहोचला. आता इलॉन मस्क यांच्या कृत्याने त्यात मोठी उडी पाहायला मिळत आहे. काही वर्षांपूर्वी मस्क यांनी डॉजेकॉइनबद्दल ट्विट करून लोकप्रिय केले होते.