ड्युअल फ्रंट कॅमे-यांनी सज्ज झिऑक्स ड्युओपिक्स एफ ९
By शेखर पाटील | Updated: February 19, 2018 18:44 IST2018-02-19T18:43:46+5:302018-02-19T18:44:50+5:30
झिऑक्स कंपनीने ड्युअल सेल्फी कॅमेर्यांनी सज्ज असणारा झिऑक्स ड्युओपिक्स एफ ९ हा स्मार्टफोन बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.

ड्युअल फ्रंट कॅमे-यांनी सज्ज झिऑक्स ड्युओपिक्स एफ ९
झिऑक्स कंपनीने ड्युअल सेल्फी कॅमेर्यांनी सज्ज असणारा झिऑक्स ड्युओपिक्स एफ ९ हा स्मार्टफोन बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.
अलीकडच्या कालखंडात बहुतांश उच्च व मध्यम किंमतपट्टयातील स्मार्टफोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात येत आहेत. यात काही कंपन्या अत्यंत किफायतशीर मूल्यात ड्युअल कॅमेर्याची सुविधा देत नवनवीन मॉडेल्स सादर करत आहेत. यात झिऑक्स या कंपनीचा समावेश आहे. झिऑक्सने गत काही महिन्यांमध्ये ड्युओपिक्स आर१ आणि ड्युओपिक्स एफ१ हे याच प्रकारातील मॉडेल्स लाँच केले आहेत. यात अनुक्रमे ड्युअल फ्रंट आणि ड्युअल रिअर कॅमेर्यांची सुविधा देण्यात आली आहे. या अनुषंगाने आता बाजारपेठेत उतारण्यात आलेल्या झिऑक्स ड्युओपिक्स एफ ९ या मॉडेलमध्ये ड्युअल सेल्फी कॅमेरे दिलेले आहेत. यांचे क्षमता अनुक्रमे ८ व २ मेगापिक्सल्स इतकी असेल. यातील एक कॅमेरा आरजीबी तर दुसरा मोनोक्रोम या प्रकारातील असून याच्या मदतीने अतिशय दर्जेदार सेल्फी प्रतिमा घेता येत असल्याचा कंपनीचा दावा आहे. यात सेल्फी फ्लॅशसुध्दा देण्यात आलेला आहे. तर ऑटो-फोकस आणि क्वॉड एलईडी फ्लॅशसह यातील मुख्य कॅमेरा ८ मेगापिक्सल्स क्षमतेचा असेल. विशेष बाब म्हणजे याच्या फ्रंट व रिअर कॅमेर्यांमध्ये बोके इफेक्ट प्रदान करण्याची सुविधा देण्यात आली आहे.
उर्वरित फिचर्सचा विचार करता, झिऑक्स ड्युओपिक्स एफ ९ या मॉडेलमध्ये ५ इंच आकारमानाचा आणि एचडी म्हणजे १२८० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले असून यावर २.५ डी ग्लासे आवरण दिले आहे. यात १.३ गेगाहर्टझ क्वॉड-कोअर प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. याची रॅम १ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तसेच यात फिंगरप्रिंट स्कॅनरसह अॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत. यातील बॅटरी २५०० मिलीअँपिअर क्षमतेची असून हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारा आहे. हे मॉडेल ग्राहकांना ६,४९९ रूपये मूल्यात खरेदी करता येणार आहे.