डेस्कटॉप, लॅपटॉप.. आता ‘बाटली’तला रोलटॉप! तुम्हाला काय सोईचा वाटतो...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 08:44 AM2022-12-16T08:44:19+5:302022-12-16T08:44:35+5:30

लोकांना असा एक लॅपटॉप पाहिजे होता ज्याचा स्क्रीन तर मोठा असेल पण प्रत्यक्षात लॅपटॉप छोटा असेल. शिवाय त्याची क्षमता भरपूर असेल पण तो उचलून न्यायला हलका, सोपा असेल.

Desktop, laptop.. Now a rolltop in a 'bottle'! | डेस्कटॉप, लॅपटॉप.. आता ‘बाटली’तला रोलटॉप! तुम्हाला काय सोईचा वाटतो...

डेस्कटॉप, लॅपटॉप.. आता ‘बाटली’तला रोलटॉप! तुम्हाला काय सोईचा वाटतो...

googlenewsNext

आजच्या घडीला जगातली सातत्याने बदलणारी आणि प्रगत होणारी काही वस्तू असेल तर ती आहे कॉम्प्युटर्स. या कॉम्प्युटर्सने अलीकडच्या काळात नवनवीन अवतार घ्यायला सुरुवात केली आहे. आधी डेस्कटॉप आला, नंतर लॅपटॉप आला, आता आला आहे रोलटॉप! रोलटॉप हा प्रकार आहे तरी काय? ते समजण्यासाठी आपल्याला आधी हे समजून घेतलं पाहिजे की मुळात कॉम्प्युटर म्हणजे काय? कॉम्प्युटरचेही वेगवेगळे प्रकार आपण पाहिले आहेत. जवळजवळ पन्नास वर्षांपूर्वी एक पूर्ण खोली भरून असलेला आपला भारतीय बनावटीचा ‘परम’ म्हणजे कॉम्प्युटर? की आता येता जाता कोणाच्याही, अगदी शाळकरी मुलांच्याही हातात सहज दिसणारा फोन म्हणजे कॉम्प्युटर? कारण त्या फोनवर ते कॉम्प्युटरवर करता येणारी सगळी कामं करताना दिसतात. मुळात कॉम्प्युटरची व्याख्या काय? -इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीच्या कायद्याप्रमाणे ज्या कुठल्या यंत्रात चिप असते तो कॉम्प्युटर! इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्टने ही व्याख्या करताना मुख्यतः सायबर गुन्हे डोळ्यासमोर ठेवलेले होते, पण आपण गुन्ह्यांपलीकडे बघितलं, तरी हीच व्याख्या सगळ्यात समावेशक वाटते. कारण अवकाशात सोडलेल्या रॉकेटपासून ते हातातल्या स्मार्टफोन्सपर्यंत सगळे कॉम्प्युटर्सच आहेत.

या कॉम्प्युटरमध्ये सातत्याने जी प्रगती होत असते ती मुख्यत: दोन बाबींमध्ये. एक म्हणजे त्याची क्षमता वाढवणं आणि दुसरं म्हणजे आकार लहान करणं. एकेकाळी ‘२८६’ हा फार प्रगत कॉम्प्युटर समजला जायचा. आता कॉम्प्युटरची रॅम जीबीमध्ये असते आणि एक टीबीची मेमरी कार्डस् बाजारात सहज उपलब्ध आहेत पण असा आकार लहान करत जाण्याला एक मर्यादा येते.
अर्थात आपण आकार किती लहान करू शकतो याला मर्यादा नाही; पण त्याच्या वापराला मर्यादा येतात. स्मार्टफोनवर आपण सगळीच कामं करू शकतो, पण मोठ्या ई-मेल्स वाचायला किंवा किचकट डिझाइन्स बनवायला मोबाइल सोयीचा नसतो. त्यावेळी मोठा कॉम्प्युटरच सोयीचा वाटतो पण तो सहजपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येत नाही. त्यामुळे लॅपटॉपचा शोध लागला. त्या लॅपटॉपमध्येही आकार आणि त्याचं वजन किती ठेवायचं हा प्रश्न अजून तसाच आहे. कारण लॅपटॉपचा आकार कमी केला तर काम करायला अडचणी येतात आणि आकार वाढवला तर वजन वाढतं. खरं म्हणजे लोकांना मोठा स्क्रीन हवा असतो, मात्र त्याचं वजन फार नको असतं. इतकंच नाही तर घडी करून ठेवलेला लॅपटॉप आकाराने फार मोठा नको असतो, पण काम करायला मात्र मोठा स्क्रीन हवा असतो. ग्राहकांच्या या गरजा भागवण्यासाठी जगभरातल्या कॉम्प्युटर बनवणाऱ्या कंपन्यांनी आजवर अनेक आकाराचे लॅपटॉप तयार केले. त्यात अगदी ११ इंच इतक्या छोट्या स्क्रीनपासून ते २७ इंच इतक्या मोठ्या स्क्रीनचा समावेश आहे. त्यात लोकांनी असे लॅपटॉप्स डिझाइन केले ज्याचा स्क्रीन रोटेट होतो. म्हणजे स्क्रीन पूर्ण गोल फिरवून समोर बसलेल्या माणसाला त्याचा स्क्रीन दिसू शकेल. लोकांनी असेही लॅपटॉप्स डिझाइन केले, ज्यात दोन बाजूंनी स्क्रीन दिसू शकतो. टचस्क्रीन असलेले लॅपटॉप्स बाजारात आले. फ्लिप डिझाइन असलेले लॅपटॉप्स, म्हणजे लॅपटॉपची उलट्या बाजूलाही पूर्ण घडी होऊ शकते, असे लॅपटॉप बाजारात आले पण तरीही लोकांना अजून काहीतरी वेगळं पाहिजे होतं.

लोकांना असा एक लॅपटॉप पाहिजे होता ज्याचा स्क्रीन तर मोठा असेल पण प्रत्यक्षात लॅपटॉप छोटा असेल. शिवाय त्याची क्षमता भरपूर असेल पण तो उचलून न्यायला हलका, सोपा असेल. त्यामुळेच रोलटॉप ही नवी संकल्पना आता आली आहे. हा जो नवीन रोलटॉप बाजारात येतो आहे त्याने लोकांच्या या घडीच्या सगळ्या गरजा पूर्ण होतील असं आता तरी वाटतं आहे. कारण या लॅपटॉपची चक्क गुंडाळी करून ठेवता येते. त्याची गुंडाळी एखाद्या मोठ्या पाण्याच्या बाटलीएवढीच होते आणि ही गुंडाळी उलगडली की लॅपटॉप समोर तयार! त्याच्या की-बोर्ड आणि माउसपॅडचीसुद्धा गुंडाळी होते. त्यामुळे त्यासाठी वेगळा की-बोर्ड माउसबरोबर बाळगावा लागत नाही. सगळ्यात भारी म्हणजे ही ‘बाटली’ अर्थात रोलटॉप काम झाल्यावर गुंडाळी करून चक्कपैकी खांद्याला लावून किंवा छोट्याशा पिशवीत टाकून फिरता येऊ शकतं. 

‘बाटली’ची गुंडाळी कमी-जास्त करा!
या रोलटॉपला १७ इंची फ्लॅट स्क्रीन ओएलईडी डिस्प्ले आहे. मल्टी टच फॅसिलिटीची सोय यात आहे. आणखी महत्त्वाचं म्हणजे जेवढी तुमची आवश्यकता आहे, तेवढीच ‘बाटली’ची ही गुंडाळी उघडा. समजा आता, मोठा स्क्रीन तुम्हाला नको आहे, मग गुंडाळी थोडीच उघडा, १३ इंची स्मार्ट टॅबलेट पीसी म्हणून ही ‘बाटली’ तुम्हाला वापरता येईल!

Web Title: Desktop, laptop.. Now a rolltop in a 'bottle'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.