CES 2019: सिगारेट सोडायला मदत करणारा 'लायटर'... सगळंच लय भारी!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2019 03:45 PM2019-01-11T15:45:58+5:302019-01-11T15:49:33+5:30

लास वेगासमधील 'कस्टमर इलेक्ट्रॉनिक शो'मध्ये लेबननच्या एका कंपनीनं आपल्या आगळ्यावेगळ्या आविष्काराची - 'स्मार्ट सिगारेट लायटर'ची झलक दाखवली.

CES 2019: This smart lighter helps you quit smoking | CES 2019: सिगारेट सोडायला मदत करणारा 'लायटर'... सगळंच लय भारी!

CES 2019: सिगारेट सोडायला मदत करणारा 'लायटर'... सगळंच लय भारी!

Next
ठळक मुद्देसिगारेटपासून दूर राहण्यासाठी च्युइंग गम, ई-सिगारेट्स, हिप्नोटिझम असे काही मार्ग आहेत.सिगारेट सोडायला मदत करणारा एक लायटर लेबननच्या कंपनीने बनवलाय.हा लायटर 'डाएट प्लॅन'सारखा 'स्मोकिंग प्लॅन' तयार करतो.

नववर्षाचे काही संकल्प अगदी न चुकता केले जातात. सिगारेट सोडण्याचा संकल्प हा त्यापैकीच एक. '१ जानेवारीपासून एकदम बंद हं, लॉक किया जाए' अशा गर्जना बरीच मंडळी करतात. पण, ३ किंवा ४ जानेवारीपर्यंतच कुठेतरी माशी शिंकते आणि सिगारेट पुन्हा सुरू होते. हे व्यसन आरोग्यासाठी हानीकारक असल्याचं कळतं, पण वळत नाही. सिगारेटपासून दूर राहण्यासाठी च्युइंग गम, ई-सिगारेट्स, हिप्नोटिझम असे काही मार्ग आहेत. काही जण त्याचा आधारही घेतात. काही जणांना त्याचा फायदाही होतो, पण बरेच जण नव्याचे नऊ दिवस संपले की जुन्याच मार्गाने जाऊ लागतात. अशांसाठी आता एक 'स्मार्ट लायटर' आशेची ज्योत' ठरू शकतो. हा लायटर सिगारेट पेटवण्याचं काम करता-करता हे व्यसन सोडवायलाही मदत करणार आहे. 

लास वेगासमधील 'कस्टमर इलेक्ट्रॉनिक शो'मध्ये लेबननच्या एका कंपनीनं आपल्या आगळ्यावेगळ्या आविष्काराची - 'स्मार्ट सिगारेट लायटर'ची झलक दाखवली. त्याचं नामकरण 'स्लायटर' असं करण्यात आलंय. तुम्ही किती सिगारेट ओढता, साधारण किती वेळाने ओढता, याचं एक गणित बांधून हा लायटर 'डाएट प्लॅन'सारखा 'स्मोकिंग प्लॅन' तयार करतो. त्या प्लॅनपेक्षा जास्त सिगारेट ओढायला गेल्यास 'स्लायटर' पेटतच नाही. हळूहळू 'स्मोकिंग प्लॅन'मधील सिगारेटची संख्या कमी-कमी होत जाते आणि सिगारेट व्यसनाच्या विळख्यातून आपली सुटका होऊ शकते. 

'स्लायटर'मध्ये जमा झालेला डेटा आपण अ‍ॅपद्वारे मित्रांना, कुटुंबीयांना पाठवू शकतो. त्याद्वारे व्यसनमुक्तीसाठी आपण करत असलेले प्रयत्न त्यांना कळू शकतील, त्यांचीही मदत मिळू शकेल. सिगारेट कमी केल्यानं किती पैसे वाचले हेही अ‍ॅपवर समजू शकेल. ही बचतही आपल्याला प्रेरणादायी ठरू शकते.     
'स्लायटर'चं काम भारी आहेच, पण त्याचा लुकही लय भारी आहे. त्यावरच्या छोट्या डिस्प्लेमध्ये, किती वेळा लायटर पेटवला त्याची माहिती आणि इतर डेटाही दिसतो. अर्थात, हा लायटर घेतला की व्यसनमुक्ती झाली, असं नक्कीच नाही. त्यासाठी मनोनिग्रह महत्त्वाचा आहेच. पण, सिगारेट सोडायची तुमची प्रामाणिक इच्छा असेल तर हा 'स्लायटर' तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवेल. त्याची किंमत १२९ डॉलर्स असून जुलै २०१९ पर्यंत तो बाजारात उपलब्ध होईल.    

Web Title: CES 2019: This smart lighter helps you quit smoking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.