कार्बन टिटॅनियम फ्रेम्स एस7 : जाणून घ्या सर्व फीचर्स

By शेखर पाटील | Published: January 17, 2018 02:55 PM2018-01-17T14:55:20+5:302018-01-17T14:55:50+5:30

कार्बन मोबाइल्स कंपनीने कार्बन टिटॅनियम फ्रेम्स एस७ हा नवीन स्मार्टफोन बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून याचे मूल्य ६,९९९ रूपये आहे.

Carbon Titanium Frames S7: Learn All FEATURES | कार्बन टिटॅनियम फ्रेम्स एस7 : जाणून घ्या सर्व फीचर्स

कार्बन टिटॅनियम फ्रेम्स एस7 : जाणून घ्या सर्व फीचर्स

कार्बन मोबाइल्स कंपनीने कार्बन टिटॅनियम फ्रेम्स एस७ हा नवीन स्मार्टफोन बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून याचे मूल्य ६,९९९ रूपये आहे. कार्बन कंपनीने एंट्री लेव्हल बाजारपेठेवर आपले लक्ष केंद्रीत केल्याचे आधीच स्पष्ट झाले आहे. या अनुषंगाने कार्बन टिटॅनियम फ्रेम्स एस७ हे मॉडेलदेखील याच वर्गवारीतील आहे. यातील ५.५ इंच आकारमानाचा २.५ डी वक्राकार ग्लासयुक्त आयपीएस डिस्प्ले हा फुल एचडी क्षमतेचा (१९२० बाय १०८० पिक्सल्स) असेल. यात क्वॉड-कोअर प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम ३ जीबी आणि ३२ जीबी इनबिल्ट स्टोअरेज असून ते १२८ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा दिलेली आहे. यात कृत्रिम बुद्धीमत्तेने युक्त असणारा निक्की हा व्हाईस कमांडवर कार्यान्वित होणारा डिजीटल असिस्टंट प्रदान करण्यात आला आहे.

याच्या मदतीने विविध चॅनल पार्टनर्सच्या माध्यमातून तिकिटांची बुकींग, रिचार्ज आदी कामे करता येतील. तसेच यातील दुसरे लक्षणीय फिचर म्हणजे १३ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा होय. यात एचडीआर, प्रो कॅप्चर, फेस डिटेक्शन, ब्युटी मोड आदी विविध फिचर्स असून याच्या मदतीने दर्जेदार सेल्फी प्रतिमा घेता येतात. तर यातील मुख्य कॅमेरादेखील १३ मेगापिक्सल्सचाच असेल. यातील बॅटरी ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची असून हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट या अद्ययावत आवृत्तीवर चालणारे आहे. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी, युएसबी-ओटीजी आदी फिचर्स असतील. तसेच यात फिंगरप्रिंट स्कॅनरसह अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत. 

कार्बन टिटॅनियम फ्रेम्स एस७ हे मॉडेल ग्राहकांना शॉपक्लुज या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करता येणार आहे. यासोबत कंपनीने काही ऑफर्सदेखील देऊ केल्या आहेत. यात या स्मार्टफोनसोबत एयरटेलची सेवा घेणार्‍या युजरला एकंदरीत २,००० रूपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. इंड्युसइंड अथवा स्टँडर्ड अँड चार्टर्ड बँकांच्या क्रेडिट अथवा डेबीट कार्डावरून हे मॉडेल खरेदी करणार्‍याला १० टक्के सवलत मिळणार आहे. तर मोबीक्विकवरून याची खरेदी करणार्‍याला २,१०० रूपयांची सुपरकॅश मिळेल.

Web Title: Carbon Titanium Frames S7: Learn All FEATURES

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.