कमी किंमतीत उत्तम फिटनेस ! हुआवे फिट, बँड 2 आणि बँड 2 प्रो भारतात लॉन्च
By शेखर पाटील | Updated: November 9, 2017 15:50 IST2017-11-08T13:53:15+5:302017-11-09T15:50:32+5:30
हुआवे कंपनीने भारतीय बाजारपेठेत फिट हे स्मार्टवॉच तसेच बँड २ आणि बँड २ प्रो हे फिटनेस बँड सादर करण्याची घोषणा केली आहे.

कमी किंमतीत उत्तम फिटनेस ! हुआवे फिट, बँड 2 आणि बँड 2 प्रो भारतात लॉन्च
हुआवे कंपनीने भारतीय बाजारपेठेत फिट हे स्मार्टवॉच तसेच बँड २ आणि बँड २ प्रो हे फिटनेस बँड सादर करण्याची घोषणा केली आहे.
हुआवे फिट, बँड २ आणि बँड २ प्रो हे तिन्ही प्रॉडक्ट काही महिन्यांपूर्वीच चीनमध्ये लाँच करण्यात आले होते. आता भारतीय ग्राहकांसाठी याला सादर करण्यात आले आहे. हुआवे फिटचे मूल्य ९,९९९ रूपये असून बँड २ आणि बँड २ प्रो हे मॉडेल्स अनुक्रमे ४,५९९ आणि ६,९९९ रूपये मूल्यात ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहेत. ग्राहक यांना अमेझॉनसह देशभरातील शॉपीजमधून खरेदी करू शकतो.
हुआवे फिट हे स्मार्टवॉच आहे. याचे डिझाईन अतिशय आकर्षक असून यात इनबिल्ट फिटनेस ट्रॅकर देण्यात आला आहे. म्हणजेच स्मार्टवॉचसह फिटनेस ट्रॅकर म्हणूनही याचा उपयोग करणे शक्य आहे. यात आल्वेज ऑन या प्रकारातील डिस्प्ले देण्यात आला असून हे मॉडेल ब्लॅक, ब्ल्यू आणि ऑरेंज या तीन रंगांच्या पर्यायात सादर करण्यात आले आहे. यात पायी चाललेले अंतर, यातून वापरण्यात आलेल्या कॅलरीज, निद्रेची मात्रा तसेच हृदयाच्या ठोक्यांचे मापन करण्याची सुविधा दिलेली आहे.
तर हुआवे बँड २ आणि बँड २ प्रो या मॉडेल्समध्ये हार्ट रेट मॉनिटर प्रणालीच्या माध्यमातून युजरच्या हृदयाच्या ठोक्यांचे मापन करून याची त्याला वेळोवेळी माहिती देण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. तर बँड २ प्रो या मॉडेलमध्ये याबाबत विश्लेषणासह सखोल माहितीची सुविधाही असेल. या दोन्ही मॉडेलमध्ये पॅसिव्ह मॅट्रीक्स ओएलईडी म्हणजेच पीएमओएलईडी या प्रकारातील वॉटरप्रुफ डिस्प्ले प्रदान करण्यात आले आहेत. हे दोन्ही बँड अँड्रॉइडच्या ४.४ तर आयओएसच्या ८.० तसेच यापुढील आवृत्त्यांवर चालणार्या स्मार्टफोनशी सुलभपणे कनेक्ट करता येतात. तर हुआवे बँड २ प्रो या मॉडेलमध्ये काही अतिरिक्त फिचर्स देण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने फर्स्टबीट ही प्रणाली असून याच्या मदतीने बँडधारकाच्या शरिरातील ऑक्सीजनच्या वापराचे अचूक मापन करता येते. अर्थात या माहितीचा स्टॅमिना वाढवण्यासाठी उपयोग होऊ शकतो. तर यामध्ये इनबिल्ट जीपीएस प्रदान करण्यात आले असून याच्या मदतीने चाललेल्या अंतराबाबतची अचूक माहिती मिळते. हे दोन्ही बँड निळा, काळा आणि लाल या तीन रंगांच्या पर्यायात उपलब्ध करण्यात आले आहेत.