AI सारखं तंत्रज्ञान नवीन आहेच परंतु ते अनपेक्षित कामही करते. हे सांगण्यामागचे कारण म्हणजे नुकतीच एक घटना समोर आली आहे. ज्यात कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या एका महिलेसाठी AI तंत्रज्ञान देवासारखं धावून आलं आहे. अमेरिकेत राहणाऱ्या एका महिलेने आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या मदतीने तिच्यावरील भरभक्कम कर्जाची रक्कम निम्म्यापेक्षा कमी केली आहे. ३५ वर्षीय जेनिफर एलन हिने या आधुनिक तंत्रज्ञानाचा शिताफीने वापर केला त्यामुळे तिने २३ हजार डॉलरचं क्रेडिट कार्डचं निम्म कर्ज फेडण्यास यशस्वी झाली. भारतीय चलनात ही रक्कम २० लाखांपर्यंत होते.
एलन ही रिअल इस्टेट एजेंट आणि कन्टेंट क्रिएटर आहे. तिने नुकतेच क्रेडिट कार्डचे २३ हजार डॉलर कर्ज फेडले आहे. ChatGPT च्या मदतीने तिने सहजपणे हे कर्ज फेडले. मिंटच्या वृत्तानुसार, जेनिफरने मुलाखतीत सांगितले की, माझे उत्पन्न ठिकठाक होते परंतु कधीही मासिक बजेट कसे ठेवायचे, पैशाचे नियोजन कसे असावे हे माहिती नव्हते. मुलीच्या जन्मापर्यंत सुरळीत सुरू होते परंतु त्यानंतर परिस्थिती बिघडली. मेडिकल खर्च, मुलीचा देखभाल यामुळे क्रेडिट कार्डचा वापर करावा लागत होता. त्यामुळे हळूहळू मी त्या कर्जाच्या जाळ्यात अडकत गेले असं तिने सांगितले.
तसेच क्रेडिट कार्डचा वापर करून आम्ही आलिशान जीवन जगत नव्हतो तरीही कर्ज इतके वाढले की मला कळलेच नाही. त्यानंतर पैसे आणि खर्च याचे नियोजन करण्यासाठी मी ChatGPT चा वापर सुरू केला आणि तिथूनच कहाणी बदलली असं जेनिफरने मुलाखतीत म्हटलं.
ChatGPT ने कशी केली मदत?
जेनिफरने खर्चाचे नियोजन करण्यासाठी ३० दिवस चॅट जीपीटीचा वापर करण्याचा निर्णय घेतला. तिने प्रत्येक दिवशी चॅट जीपीटीवर तिचा खर्च कमी करण्यासाठी सल्ला घेणे सुरू केले. प्रत्येक दिवशी ChatGPT ने दिलेल्या सल्ल्यानुसार खर्च कमी करण्याचा प्रयत्न केला. या महिलेने वायफळ सब्सक्रिप्शन रद्द केले. काही खात्यांमध्ये असलेल्या फंडचा वापर केला. पैसे वाचवण्यासाठी वेगवेगळे जुगाड केले. ChatGPT च्या सल्ल्यानुसार जेनिफरने एक टास्क केले. ज्यात सर्व आर्थिक APP आणि बँक खात्यावर लक्ष ठेवले. त्यावेळी एका जुन्या पेड ब्रोकरेज अकाऊंटवर अनेक ठिकाणी उरले सुरले पैसे मिळाले. हे सर्व करून तिला १० हजार डॉलर म्हणजे ८.५ लाखाची रक्कम अशाठिकाणी सापडली ज्याकडे तिचे लक्ष गेले नव्हते.
दरम्यान, ChatGPT ने दिलेल्या सल्ल्यातून जेनिफरला पैसे वाचवण्यासही मदत झाली. सल्ल्यानुसार, तिने घरीच जेवण बनवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तिचे बाहेरील जेवणावर होणारा खर्च जवळपास ५० हजारांपर्यत कमी केला. जेनिफरने महिना अखेरपर्यंत १२ हजार ७८ डॉलर कर्ज फेडले. त्याप्रकारे तिने एका महिन्यात क्रेडिट कार्डच्या कर्जावरील निम्मी रक्कम फेडून टाकली.