झेडपीच्या बंद शाळांची रंगरंगोटी झाली पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:48 IST2021-09-02T04:48:22+5:302021-09-02T04:48:22+5:30
लोकसहभाग अन् गुरूजींचा पुढाकार माळशिरस : कोरोना महामारीत विद्यार्थी व पालकांना शाळांचा विसर पडू लागला आहे. मात्र तालुक्यातील झेडपी ...

झेडपीच्या बंद शाळांची रंगरंगोटी झाली पूर्ण
लोकसहभाग अन् गुरूजींचा पुढाकार
माळशिरस : कोरोना महामारीत विद्यार्थी व पालकांना शाळांचा विसर पडू लागला आहे. मात्र तालुक्यातील झेडपी शिक्षकांनी या वेळेचा सदुपयोग करीत स्वतःच्या खिशातील पैशांबरोबरच लोकवर्गणीतून शाळा रंगीबेरंगी रंगाने रंगवत शाळेच्या परिसराचं रुपडंच पालटून टाकलं आहे. माळशिरस तालुक्यातील १४१ शाळांनी रंगरंगोटी पूर्ण करीत स्वच्छ शाळा, सुंदर शाळा या योजनेत सहभाग नोंदविला आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ‘स्वच्छ शाळा, सुंदर शाळा’ अभियानामुळे बंद असणाऱ्या शाळांचा उत्साह वाढला. केंद्रप्रमुखांच्या बैठका, शिक्षकांचा उत्साह व लोकवर्गणीची साथ यामुळे शाळेचे संपूर्ण रंगकाम, आकर्षक बोलक्या भिंती, शाळा सजावट, वृक्षारोपण, विविध फुलांची झाडे, परसबाग, सुंदर मैदान, खेळाचे साहित्य, आकर्षक संरक्षक भिंत इत्यादी बाबी पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण परिसरातून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना या शाळा आकर्षण ठरत आहेत.
शाळांच्या सुरू झाल्या स्पर्धा
माळशिरस तालुक्यातील जि.प. शाळांचे चित्र बंद काळात पूर्ण बदलून गेले आहे. यासाठी ‘स्वच्छ शाळा, सुंदर शाळा’ माध्यमातून गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख यांच्या प्रोत्साहनाने ३५ लाखांपेक्षा जास्त लोकसहभागातून निधी उभारला आहे. पिलीव, कारुंडे, उंबरे-दहीगाव, तुपेवस्ती, मुंडफणेवस्ती आदी शाळांनी पाच लाखांच्या पुढे लोकवर्गणी गोळा करीत मोठी आघाडी घेतली. यात शिक्षकांसह गावातील आजी-माजी पदाधिकारी व तरुणांचा मोठा सहभाग दिसत आहे.
कोट ::
वरिष्ठ अधिकारी, शिक्षक व गावातील दानशूर मंडळींचा या उपक्रमासाठी भरभरून प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे लोकवर्गणीच्या माध्यमातून शाळेची रंगरंगोटी व परिसराची स्वच्छता करणे शक्य झाले. आणखी येणाऱ्या निधीतून वेगवेगळ्या सुविधा शाळेसाठी सज्ज होत आहेत.
- धनाजी जाधव
मुख्याध्यापक, देशमुख वस्ती शाळा