झेडपीच्या शिक्षकांची मंत्र्यांकडे तक्रार; सीईओंनी घेतले शिक्षणाधिकाऱ्यांना फैलावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2020 01:02 PM2020-11-06T13:02:02+5:302020-11-06T13:02:05+5:30
कोल्हापुरात दिले निवेदन: सोलापुरात घडल्या घडामोडी
सोलापूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ हे प्रश्न सोडवित नसल्याची तक्रार जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची कोल्हापुरात भेट घेऊन केली आहे. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी वायचळ यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांना केबीनमध्ये बोलावून शिक्षकांच्या प्रश्नाबाबत जाब विचारला.
विविध पदांच्या पदोन्नतीसह आंतरजिल्हा शिक्षकांचे समुपदेशन करतानाच यादीमध्ये विस्थापित व रॅण्डम राऊंड मधील शिक्षकांचा समावेश करण्याची मागणी शिक्षक संघाने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. राज्य संघाचे मोहन भोसले,कार्याध्यक्ष एन. वाय. पाटील यांच्याबरोबर सोलापूर जिल्हा शिक्षक संघाचे सरचिटणीस बब्रुवाहन काशीद, मनोज गादेकर यांनी मंगळवारी सकाळी कोल्हापुरात ग्रामविकास मंत्र्यांची घेतली. काशीद यांनी प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबद्दल मुख्य कार्यकारी अधिकाºयांशी वारंवार चर्चा करूनही प्रश्न सुटत नसल्याने लक्ष घालण्याची विनंती केली. इतर जिल्ह्यातून बदलीने येणारे शिक्षक हजर झाल्यानंतर समुपदेशन घेण्यास विलंब, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख आणि विस्ताराधिकारी पदाची पदोन्नती रखडली आहे. पुणे विभागीय आयुक्तांनी दोषमुक्त केलेल्या शिक्षकांचे समुपदेशन करावे अशी मागणी या निवेदनात केली आहे.
कारीतील शिक्षकांचा प्रश्न
बार्शीतील कारी हे गाव उस्मानाबादला जोडण्यात आले आहे. त्यामुळे येथील शिक्षक कोणाचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. येथील शिक्षकांनी उस्मानाबाद विकल्प निवडला आहे. पण शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी असे समायोजन करता येत नाही असे म्हटले आहे.
प्रश्नांवर निर्णय घ्यावा
पदोन्नती करून शाळा नियुक्तीचे समुपदेशन घेतले तर रिक्त जागांचे पर्याय वाढतील. पण दोन वर्षे पाठपुरावा करून प्रशासनाने यावर निर्णय घेतला नसल्याबद्दल जिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष म. ज. मोरे यांनी नाराजी व्यक्त केली.