सोलापूरचे झेडपी शिक्षक बनले सात कोटींचे ग्लोबल टीचर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:45 IST2020-12-05T04:45:04+5:302020-12-05T04:45:04+5:30
सोलापूर : युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर प्राईझ पुरस्कार आज जाहीर झाला. ...

सोलापूरचे झेडपी शिक्षक बनले सात कोटींचे ग्लोबल टीचर
सोलापूर : युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर प्राईझ पुरस्कार आज जाहीर झाला. जगातील १४० देशातील शिक्षकांतून सोलापूरच्या परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांची निवड करण्यात आली आहे. सात कोटी रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी याची अधिकृत घोषणा केली. असा पुरस्कार मिळविणारे ते पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत. जगभरातील १४० देशांतील १२ हजारांहून शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसले गुरुजींची घोषणा करण्यात आली आहे. क्यूआर कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रात अभिनव क्रांती केलेल्या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
५० टक्के रक्कम देणार
पुरस्काराच्या एकूण रकमेपैकी ५० टक्के रक्कम अंतिम फेरीतील ९ शिक्षकांना देण्याचे रणजितसिंह डिसले यांनी जाहीर केले असून, यामुळे ९ देशांतील हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाईल. डिसले गुरुजींना मिळालेली रक्कम ते टीचर इनोव्हेशन फंडाकरिता वापरणार असून त्यामुळे शिक्षकांमधील नवोपक्रमशीलतेला चालना मिळणार आहे.
..................
‘लोकमत’चा पुरस्कार
२०१९ साली ‘लोकमत’च्या वतीने रणजितसिंह डिसले यांना ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इअर’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीची दखल घेत ‘लोकमत’ने त्यांचा गौरव केला होता.