चिंताजनक!..उजनी यंदा महिनाआधीच मायनस होणार! उपयुक्त पाणीसाठा केवळ 12.91 टक्के
By रवींद्र देशमुख | Updated: April 20, 2023 18:44 IST2023-04-20T18:43:49+5:302023-04-20T18:44:10+5:30
मागील पावसाळ्यात उजनी धरण १११ टक्के भरून धरणात १२३ टीएमसी एवढा प्रचंड जलसाठा झाला होता.

चिंताजनक!..उजनी यंदा महिनाआधीच मायनस होणार! उपयुक्त पाणीसाठा केवळ 12.91 टक्के
सोलापूर : पाणी साठवण क्षमतेच्या बाबतीत राज्यात सर्वात मोठे धरण, अशी ओळख असलेल्या उजनी धरणातून चालूवर्षी बेसुमार पाणी सोडल्याने मागील वर्षाच्या तुलनेत धरण एक महिन्या अगोदर मायनसमध्ये जाणार असल्याने ऐन उन्हाळ्यात शेतीचा पाणी प्रश्न उग्ररूप धारण करणार आहे.
मागील पावसाळ्यात उजनी धरण १११ टक्के भरून धरणात १२३ टीएमसी एवढा प्रचंड जलसाठा झाला होता. तो ७ ऑक्टोबरपर्यंत टिकून होता. त्यानंतरच्या काळात शेती व सोलापूरसाठी वेळोवेळी पाणी सोडल्याने धरणातील पाणीसाठा सात महिन्यांत ५३ टीएमसीने कमी झाला आहे. मागील वर्षी उजनी धरण ८ जूनपासून मायनसमध्ये जाण्यास सुरुवात झाली होती. ते आठ जुलै रोजी १२.७७ टक्के मायनस झाले होते. मात्र, चालू वर्षी दि.२० एप्रिल रोजी धरणात १२.५३ टक्के उपयुक्त साठा आहे. धरणातून सध्या सीनामाढा उपसा योजना, दहिगाव योजना, बोगदा व मुख्य कालवा यातून ४,१३३ क्युसेक पाणी शेतीसाठी सोडले जात आहे. तसेच बॅक वॉटरमधूनही शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा केला जात आहे. त्यातच सध्या सूर्य आग ओकत असल्याने धरणातील पाण्याचे बाष्पीभवनही मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे दररोज धरणातील पाणीसाठा पाऊण टक्क्याने कमीकमी होत आहे. त्यामुळे उजनी धरण मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच मायनसच्या दिशेने वाटचाल करणार आहे.
उपयुक्त जलसाठा केवळ १२.९१ टक्केच
मागील वर्षी दि. २० एप्रिल रोजी उजनी धरणात ४५.३५ टक्के उपयुक्त जलसाठा होता तो चालू वर्षी मात्र, १२.९१ टक्के एवढाच आहे. मागील वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी उपयुक्तसाठा ३३ टक्के कमी आहे. त्यामुळे उन्हाळ्यात शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीररूप धारण करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.