बालाजी विधाते
कारी: विश्व हे अनेक क्षेत्रांचे मैदान आहे. या मैदानात अनेक व्यक्ती आपल्या कर्माच्या परिश्रमावर आपला ठसा समाजात उमटवत असतात. कारी (ता. बार्शी) येथील सेद्दुनिसा उर्फ बडबडी खुदबुद्दीन सय्यद (वय ८५) या अर्धवेळ असलेल्या परिचारिकेने कारी गावात ४० वर्षे आपले जीवन आरोग्यसेवा करण्यात समर्पित करून स्वत:ला व आपला परिवार घडवला.
स्वर्गवासी पती यांनी देखील कारी पोस्ट आॅफिसमध्ये २० वर्षे ग्रामीण डाकिया म्हणून कर्तव्यदक्ष सेवा बजावली. दोघांच्या तुटपुंज्या मानधनावरच आपल्या कुटुंबाची अर्थव्यवस्था सांभाळून अपत्याला आकार दिला. लसीकरण असो वा आरोग्य शिबीर पूर्ण गावभर प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींना भाऊ व वहिनींना हा संदेश देणे, त्यांच्या या कार्यामुळे त्यांना ‘बडबडी सिस्टर’ म्हणून पूर्ण गावभर लौकिक प्राप्त झाला आहे. रुग्णसेवेसोबतच कौटुंबिक जबाबदारीचे पालन करून तीन मुलींचे विवाह केले.
चार मुले शासकीय सेवेत कार्यरत आहेत. मोठा मुलगा गफूर हा मुंबईत पोस्टमन पदावरून सेवानिवृत्त झाला. दुसरा अब्दुल रफिक तोगराळीमध्ये सहशिक्षक तर तिसरा रशीद डी.एड. होऊन (मुगळी, ता. अक्कलकोट) येथे शिक्षक व चौथा रसूल मुंबई येथे पोस्टमनची नोकरी करत आहे. जीवनभर प्रामाणिक सेवा केली. आता नातीला घडवण्यासाठी स्वत:चा पूर्ण वेळ आज देखील शिक्षणासाठी देतात.
ना कौतुकाची व ना पुरस्कारराची अपेक्षा ठोून काम केले. प्रामाणिक व पारदर्शक सेवा केल्यामुळे माझे कुटुंब घडले आहे, परंतु अशा अर्धवेळ परिचारिकांना वृद्धापकाळासाठी पेन्शनची गरज आहे, असे सेद्दुन्निसा उर्फ बडबडी सय्यद यांनी सांगितले.