मदतीला गेला अन् जीव गमावला !
By Admin | Updated: September 24, 2014 14:01 IST2014-09-24T14:01:02+5:302014-09-24T14:01:02+5:30
पोल काही उभा राहत नव्हता. अखेर त्यांनी एकाला मदतीसाठी बोलावले खरे, मात्र मदतीसाठी आलेल्याच्याच अंगावर पोल पडल्याने त्याचा मृत्यू झाला.

मदतीला गेला अन् जीव गमावला !
>सोलापूर : विजेचा पोल (खांब) उभा करायचा होता. महावितरणचे कर्मचारी त्यासाठी प्रयत्न करीत होते. पोल काही उभा राहत नव्हता. अखेर त्यांनी एकाला मदतीसाठी बोलावले खरे, मात्र मदतीसाठी आलेल्याच्याच अंगावर पोल पडल्याने त्याचा मृत्यू झाला. दगडू याकूब शेख (वय४५, रा. चिंचोळी काटी, एमआयडीसी, पुणे रोड, ता. मोहोळ) असे मरण पावलेल्याचे नाव आहे.
आज (मंगळवारी) दुपारी २ वाजता चिंचोळी काटीतील धर्मराज नगरात महावितरणकडून विजेचे पोल (खांब) उभे करण्याचे काम सुरू होते. एका ठिकाणचा पोल उभा करण्यासाठी उपस्थित अधिकारी, कर्मचार्यांनी दगडू शेख याला मदतीला बोलावले.
त्यानेही तातडीने होकार देताच त्याच्या कामात सहभागी झाला. खड्डय़ातून पोल उचलून तो उभा करीत असताना इतरांचे नियंत्रण सुटले आणि तो नेमका दगडू शेख याच्या अंगावर पडला. त्यात तो गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्याला तातडीने सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच तो मरण पावला. सिव्हिल चौकीत या घटनेची नोंद झाली आहे. (प्रतिनिधी)
चार दिवसांवर मुलाचे लग्न
■ दगडू शेख हा तसा कष्टकरी. त्याच्या एका मुलाचे लग्न झालेले आहे तर दुसर्या मुलाचे लग्न चार दिवसांवर येऊन ठेपले होते. घरात लगीनघाई असतानाच काळाने त्याच्यावर झडप घातली. 'मदतीला गेला अन् जीव गमावला', असेच घटनास्थळी ऐकावयास मिळत होते.