पाणीपुरवठा अधिकाऱ्यांच्या बदल्या
By Admin | Updated: June 26, 2014 01:13 IST2014-06-26T01:13:51+5:302014-06-26T01:13:51+5:30
गिरगावकर मुंबईला: संजय धनशेट्टी गडचिरोलीला

पाणीपुरवठा अधिकाऱ्यांच्या बदल्या
सोलापूर: पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्या आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता एम.जी.गिरगावकर यांची मुंबईला बदली झाली असून त्यांच्या जागी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सुखदेव गरांडे यांची नियुक्ती केली आहे. मात्र त्यांच्याकडे सोलापूर व सांगली असे दोन पदभार राहणार आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील कार्यकारी अभियंता व उपअभियंत्यांच्या बदल्या केल्या आहेत. वर्षभराखाली सोलापूर जि.प.ला रुजू झालेले एम.जी. गिरगावकर यांची त्यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विरार कार्यालयात बदली केली आहे. उपअभियंत्यांच्याही बदल्या झाल्या असून, सांगोल्याचे मिलिंद देशपांडे यांची कराडला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला बदली झाली आहे. देशपांडे यांच्या बदलीने रिक्त झालेल्या जागेवर माळशिरसचे पुरुषोत्तम भांडेकर बदलून गेले आहेत. करमाळा-माढ्याचे उपअभियंता विजय पुरंदरे यांची उस्मानाबाद जि.प. ला तर उस्मानाबाद जि.प.चे बी.के. नागणे हे पुरंदरे यांच्या जागेवर बदलून आले आहेत.
दक्षिण सोलापूरचे उपअभियंता संजय धनशेट्टी यांची गडचिरोलीला बदली झाली असून त्यांच्या जागी सातारा जिल्ह्यातून आर.बी. साठे हे बदलून येणार आहेत. माळशिरसला एम.व्ही. फडके हे जालन्याहून बदलून आले आहेत.