सोलापूर शहरात पाणीबाणी, आता सहा दिवसानंतर होणार पुरवठा
By राकेश कदम | Published: May 9, 2024 08:58 PM2024-05-09T20:58:14+5:302024-05-09T20:58:22+5:30
जपून वापर आवश्यक : प्रशासनाचे आवाहन
सोलापूर : उजनी धरण आणि औज बंधाऱ्यातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे महापालिका आयुक्त शितल तेली उगले यांनी संपूर्ण शहरात रविवार (१२ मे) पासून पाच दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय गुरुवारी सायंकाळी घेतला. शहर असो हद्दवाढ भागातील नळांना आता सहा दिवसानंतरच पाणी येईल. पाउस हाेईपर्यंत पुढील अडीचे महिने ही परिस्थिती राहणार आहे.
शहराला उजनी ते सोलापूर जलवाहिनी, टाकळी ते सोरेगाव योजनेतून पाणी पुरवठा होतो. उजनी धरणाची पाणी पातळी गुरुवारी वजा ४३ टक्के होती. शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी धरणातून शुक्रवारी भीमा नदीत पाणी सोडण्यात येईल. हे पाणी २० मे पर्यंत औज बंधाऱ्यात पोहोचणार आहे. हे पाणी सोडल्यामुळे धरणाची पातळी वजा ५० टक्क्याहून कमी होईल.
दुसरीकडे धरणाची पाणी पातळी कमी झाल्यामुळे पालिकेला उजनी पंपगृहावर तिबार पंपिंग करावे लागेल. या दोन्ही योजनांवर परिणाम होणार असल्यामुळे शहरात सरसकट सहा दिवसानंतर पाणी देण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला.