पाणी सोलापूरच्या शेतकऱ्यांच्या हक्काचे, बारामतीकरांसाठी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:23 IST2021-05-06T04:23:37+5:302021-05-06T04:23:37+5:30
मोहोळ : उजनीच्या पाच टीएमसी पाण्याच्या निर्णयावरून मोहोळ तालुक्यात आता राजकीय रंग चढू लागला आहे. माजी आमदार ...

पाणी सोलापूरच्या शेतकऱ्यांच्या हक्काचे, बारामतीकरांसाठी नाही
मोहोळ : उजनीच्या पाच टीएमसी पाण्याच्या निर्णयावरून मोहोळ तालुक्यात आता राजकीय रंग चढू लागला आहे. माजी आमदार राजन पाटील यांनी धरणाची उंची वाढवू, इंदापूरला पाणी नेण्यास काहीच हरकत नाही, असे केलेल्या विधानावर शिवसेनेचे सोमेश क्षीरसागर यांनी आक्षेप घेतला आहे. जरी धरणाची उंची वाढविली तरी ते पाणी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे आहे, बारामतीकरांसाठी नाही असा आरोप केला आहे. सोमेश क्षीरसागर म्हणाले, माजी आमदार राजन पाटील यांनी सर्वच वर्तमानपत्रांना सांगितले की, उजनी जलाशयातील ५ टीएमसी पाणी नेण्यास आमचा विरोध आहे. कारण हे पाणी नेले तर शेतकऱ्यांवर खूप मोठा अन्याय होईल. त्यांच्या या वक्तव्याचा अभिमान वाटला; परंतु त्यांनी सांगितले की, १९९३ रोजी मंत्रिमंडळातील निर्णयानुसार धरणाची उंची २ मीटरने वाढवली तर धरणात १२ टीएमसी पाण्याची वाढ होईल. त्यामुळे ५ टीएमसी पाणी इंदापूरला नेता येईल. म्हणजे १२ टीएमसी पाण्याची अतिरिक्त वाढ झाली तर ५ टीएमसी इंदापूरला व राहिलेले ७ टीएमसी पाणी कर्जत जामखेडला जावू शकते, असा आरोप करत उजनीचे धरण हे सोलापूर जिल्ह्यासाठीच आहे आणि त्याचा वापर सोलापूर जिल्ह्यातील जनतेच्या पिण्याच्या व शेतकरी कष्ठकरी जनतेच्या हक्काचे आहे. त्याचा संपूर्ण वापर हा जिल्ह्यासाठीच व्हावा ही जनतेची मागणी आहे.
----
...यासाठीच यशवंतरावांनी धरणाची स्थापना केली
सोलापूर जिल्हा हा दुष्काळी आहे. त्या ठिकाणी बारमाही पाण्याच्या पाळ्या मिळाव्या यासाठीच स्व.यशवंतराव चव्हाण यांनी धरणाची स्थापनाच केली आहे; परंतु सध्या उजनीच्या सर्व वाटपातून नियोजनातून फक्त चार महिने पाण्याच्या पाळ्या उजनीतून सोलापूर जिल्ह्यात मिळत आहे. जर का धरणाची उंची दोन मीटरने वाढवली तर १२ महिने पाण्याच्या पाळ्या मिळण्याच्या उद्देशाने जे धरण बांधले होते ते किमान सोलापूर जिल्ह्याला ८ महिने तरी शेतकरी व कष्ठकरी जनतेला मिळतील. राजन पाटील दोन मीटर धरणाची उंची वाढवण्याची जी मागणी केली आहे. ती अतिशय स्वागतार्ह आहे. धरणाची भिंत २ मीटरने वाढवली तरी ती सोलापूरकरांच्या हितासाठीच वाढवावी. भविष्यात जर १२ टीएमसी पाणी वाढले तर इंदापूरकर अथवा बारामतीकरांचा किंवा आणखी कुणाचा उजनी धरणावर काही एक अधिकार नाही.
याबाबतचे सविस्तर निवेदन शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.
----
फोटो : सोमेश क्षीरसागर