Walmik Karad : राज्यभर चर्चेत असलेल्या कराड प्रकरणाचे कनेक्शन सोलापूरशी जोडले गेल्याने पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार पोलिसांच्या अहवालावर न्यायालयाने सुनावणीसाठी आजची तारीख नेमली असून, यावर सुनावणी होणार आहे.
वाल्मीक कराड याचा मुलगा सुशील कराड याच्या नावे असलेली फर्म सान्वी ट्रेडर्स व त्यांच्या पत्नीच्या नावे असलेली फर्म अन्वी इंटरप्रायझेस या फर्ममध्ये फिर्यादी महिलेचा पती मॅनेजर पदावर कामास होता. त्याने १ कोटी ८ लाख रुपयांचा अपहार केल्याचा सुशील कराड याने १९ जुलै २०२४ रोजी परळी शहर पोलिस स्टेशन येथे दाखल केली आहे. दरम्यान, प्रस्तुत प्रकरणातील फिर्यादी महिलेने जबरदस्तीने गाडया, सोने व प्लॉट जागा खरेदीखतान्वये लिहून घेतल्याचा तक्रार अर्ज एमआयडीसी पोलिस स्टेशन सोलापूर येथे दाखल केला आहे; परंतु घडलेल्या घटना या परळी शहरातील असल्याने पोलिसांनी तिकडे तक्रार दाखल करण्याचे समजपत्र फिर्यादीस दिलेले होते. त्यानंतर फिर्यादी महिलेने पोलिस महासंचालकाकडे तक्रार दाखल केली. त्याचा तपास परळी, बीड पोलिसांनी केला. त्यामध्ये साक्षीदारांचे जबाब नोंदवून व पुरावा गोळा केल्यानंतर फिर्यादी महिलेचे तकारीत तथ्य नसल्याचे व तिने अपहाराच्या गुन्ह्यास शह देण्यासाठी तक्रार केल्याचे निरीक्षण नोंदवून पोलिसांनी गुन्हा घडला नसल्याचा अहवाल दिला. त्यामुळे फिर्यादी महिलेने सोलापूर येथील न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल केलेली आहे. त्यावर सुनावणीसाठी २१ जानेवारी तारीख नेमलेली आहे.
यात आरोपीतर्फे अॅड. संतोष न्हावकर, अॅड. राहुल रूपनर, अॅड. शैलेश पोटफोडे तर फिर्यादीतर्फे अॅड. विनोद सूर्यवंशी, अॅड. श्रीकांत पवार, अॅड. मधुकर व्हनमाने काम पाहत आहेत.
फिर्यादी पक्षाचा युक्तिवाद
पीडितेचे वकील अॅड. विनोद सूर्यवंशी यांनी आपल्या युक्तिवादात पीडितेने दाखल केलेले तक्रार अर्ज, तसेच अर्जासोबतची कागदपत्रे जीपीएस लोकेशन, पीडितेच्या पतीस मारहाण करून झालेल्या जखमांचे फोटो, आरोपी सुशील कराड याने फोनवरून शिवीगाळ केल्याचे फोन रेकॉर्डिंगचे पेन ड्राइव्ह, पोस्टाने पाठविलेले अर्ज व त्याच्या पावत्या तसेच पीडितेच्या लहान मुलीस मारहाण केली असल्याने पोस्कोअंतर्गत गुन्हा दिसून येतो अशा सर्व बाबींचे कथन करून गुन्हा हा परळी ते सोलापूर असा सलग रीतीने घडलेला असल्यामुळे आरोपींविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करून तपास करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात यावेत, असे म्हटले आहे.