‘समीक्षा’ची वाहने जप्त
By Admin | Updated: September 3, 2014 00:50 IST2014-09-03T00:50:19+5:302014-09-03T00:50:19+5:30
महापालिकेतर्फे ट्रॅक्टरची व्यवस्था

‘समीक्षा’ची वाहने जप्त
सोलापूर : कर्जाचा हप्ता थकल्याने शहरातील कचरा उचलण्याचा ठेका घेतलेल्या समीक्षा कंपनीकडे भाड्याने असलेल्या १९ घंटागाड्या बॉम्बे मर्कंटाईल बँकेने सोमवारी सायंकाळी जप्त केल्या. कचऱ्याची समस्या वाढू नये म्हणून महापालिकेने २६ ट्रॅक्टर भाड्याने घेऊन कचरा उचलण्याचे काम सुरू केले आहे.
समीक्षा कंपनी शहरातील कचरा उचलण्यात गेल्या काही दिवसांपासून अडचणीत आली आहे. कंपनीकडे भाड्याने असलेल्या गाड्यांचा हप्ता भरलेला नाही. विमा संपलेला आहे. अशात कचरा उचलण्यात हयगय केली म्हणून महापालिकेने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. शहरात कचऱ्याचे १२00 स्पॉट आहेत. प्रत्येक स्पॉटला २00 रुपयांप्रमाणे दंड आकारल्याने कंपनीने गेल्या नऊ महिन्यांत बिले सादर न करता उचल घेतली. आयुक्त चंद्रकांत गुडेवार रूजू झाल्यावर कंपनीला बिले सादर करण्याबाबत सूचना केली. मुदत देऊनही कंपनीने बिले दिली नाहीत. सभागृहात हा विषय आला. सदस्यांनी कंपनीवर कारवाई करावी, असा ठराव एकमताने मंजूर केला. प्रशासनाने कारवाईची पावले उचलली आहेत. कराराचा अभ्यास करून पुढील दिशा ठरविली जाईल, असे आयुक्त गुडेवार यांनी सांगितले.
दरम्यान, काम सुरू ठेवण्याबाबत समीक्षाची धडपड सुरू आहे. समीक्षाचे प्रोप्रायटर रवींद्र राठोड (रा. शंकरनगर, विंचूर) यांनी बँकेला ३0 लाखांचा धनादेश देऊन इतर वाहने जप्त न करण्याबाबत बॉम्बे मर्कंटाईल बँकेला मुदत मागितली आहे. बँकेला दिलेल्या हमीपत्रात त्यांनी आरिफबेग मिर्जा (रा. मालेगाव), मनसफबेग अहमदबेग यांनी मालेगाव येथील बॉम्बे मर्कंटाईल बँकेकडून कर्ज घेऊन ४0 गाड्या खरेदी करुन समीक्षाकडे भाड्याने दिल्या आहेत. या गाड्यांची जबाबदारी राठोड यांनी घेतली आहे. पण बँकेची पुढील दिशा काय असणार हे समजू शकले नाही.
------------------------------------------
आठ मक्तेदारांना काम
आरोग्य विभागाने ३१ आॅगस्टला खास आदेश काढून ५८५ प्रति टन कचरा उचलण्याच्या अटीवर ८ मक्तेदारांना काम दिले आहे. अश्रुबा वाघमारे, राजशेखर नवगिरे, वामन जगताप, अमीर पटेल, किरण काटकर यांना काम देऊन २६ ट्रॅक्टर व १0४ बिगाऱ्यांच्या मदतीने कचरा उचलण्याचे काम सुरू केले आहे.